Mangalvedha, 01 January : मंगळवेढा नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत अरुणा माळी ह्या जनतेतून थेट निवडून आल्या होत्या. माळी यांच्या 2016 ते 2021 या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या पतीचा कारभारात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार अन्य नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षांच्या पतीचा कारभरातील हस्तक्षेप थांबला. पण अरुणा माळी यांनी पतीला नगरपालिकेत आणण्याचा चंग बांधला आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अरुणा माळी यांचे पती सोमनाथ माळी यांची नगरपालिकेत एन्ट्री झाली आहे, त्यासाठी नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.
मंगळवेढा (Mangalvedha) नगरपालिकेच्या 2006 च्या निवडणुकीत अरुणा माळी यांनी पहिल्यांदा नगरसेवकपदासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. पहिल्याचा प्रयत्नांत त्यांना यश मिळाले होते. गेली पाच वर्षे नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर 2011 मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत त्यांचा 73 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवानंतरही माळी दांपत्याने संबंधित प्रभागात आपले सामाजिक काम नेटाने सुरू ठेवले होते.
सरकारने 2016 मध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार मंगळवेढा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतून त्यावेळी तत्कालीन आमदार भारत भालके यांनी काँग्रेसचे आमदार असूनही नगराध्यक्षपद राष्ट्रवादीचे प्रांतिक नेते राहुल शहा यांच्या गटाकडे देण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती. त्यानुसार अरुणा माळी या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नगराध्यक्ष झाल्या होत्या.
गेली पाच वर्षांत त्यांनी अन्य नगरसेवकाच्या सोबतीने शहरात विकास कामेही मोठ्या प्रमाणात केली. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांमध्ये नगरपालिकेने सहभागही घेतला. मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना चटके सहन करावे लागले. पण, नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू दिली नव्हती. एक दिवसा आड का होईना पाणीपुरवठा करण्याचे काम त्यांनी केले होते.
अरुणा माळी यांच्या कार्यकाळात त्यांचे पती सोमनाथ माळी यांचा हस्तक्षेप होऊ लागल्याने अन्य नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला होता. याबाबत वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढत पतीचा नगरपालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप थांबवला होता. ही बाब तत्कालीन नगराध्यक्षा अरुणा माळी यांना खटकली होती. मात्र त्यांनी त्याचवेळी पतीला नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून मानाने पाठवण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग सातची जागा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित होती, त्या जागेवर पती सोमनाथ माळी यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीत अरुणा माळी ह्या पत्नी म्हणून सोमनाथ माळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांना विजयी करण्यासाठी मोठे कष्ट घेतले.
नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामाची संपूर्ण माहिती प्रभागातील जनतेसमोर ठेवून पतीला विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी अपेक्षेप्रमाणे कौल देत त्यांना नगरपालिकेत मानाने पाठवले आणि पतीसाठी जिद्दीने लढलेली पत्नी निवडणुकीतून दिसून आली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.