Satara Politics : माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय, मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे लवकरच हाती कमळ घेणार असल्याचे निश्चीत झाले आहे. मुंबईत मंत्रालायत कऱ्हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत आज त्यांनी भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचा भाजपमधील प्रवेश निश्चीत मानला जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासुन शिंदे कोणत्या पक्षात जाणार या सुरु असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. उद्या (बुधवारी) भाजपच्या नेत्यांच्या उपस्थिती शिंदे यांचा भाजप प्रवेश होईल असेही सांगण्यात येत आहे.
कऱ्हाड दक्षिण हा अनेक वर्षापासुन कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते, माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच आत्तापर्यत कऱ्हाड दक्षिणचे मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. पण काँग्रेसच्या या बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे. ते कऱ्हाड दक्षिणचे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांनी आमदार झाल्यापासून पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याअंतर्गत त्यांनी काँग्रेसमधील अनेकजण भाजपवासी करुन काँग्रेसच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास प्रारंभ केला आहे.
आमदार भोसले यांनी आधी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे समर्थक असलेले मलकापुरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये घेतले. त्यानंतर नरेंद्र नांगरे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले-पाटील यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्त्यांना टप्याटप्याने भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे शिल्लक राहिलेले समर्थक माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. मात्र चव्हाण आणि डॉ. भोसले गटाचा छतीसचा आकडा असल्याने त्याला दुरोजा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला मुहुर्त मिळत नव्हता.
पुन्हा शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर मध्यंतरी त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या कऱ्हाड दक्षिण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका ठेवली. त्यानंतर पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे ते भाजपवासी होणार की अन्य कोणत्या पक्षात जाणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात आमदार डॉ. भोसले यांच्या समवेत बांधकाममंत्री आणि जिल्ह्यातील भाजपचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मंत्री भोसले यांनी शिंदे यांचे बुके देवुन स्वागत केले. त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश निश्चीत मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. उद्याच त्यांचा भाजपच्या नेत्यांच्या उपस्थिती प्रवेश होईल असे सांगितले जात आहे.
कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसची ताकद होतेय कमी :
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकखांबी तंबु उध्वस्त करण्याचे काम भाजपने केले आहे. त्या पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते फोडुन भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले आहेत. त्यामुळे त्यांची रयत संघटनाही त्या पक्षात गेली आहे. त्यामुळे एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पक्षाला आता त्याच मतदार संघात उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत अजूनही काही प्रवेश होतील. त्यामुळे कॉंग्रेसला आपल्या असित्वासाठीच लढावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.