

BJP campaign strategy : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसे संकेत सत्ताधारी पक्षांतील नेत्यांकडून देण्यात आले आहेत, हे विशेष. राज्य निवडणूक आयोगाकडून मात्र अद्याप अधिकृतपणे यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. असो. यात काही नवीन नाही. यापूर्वीही एका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी सत्ताधारी नेत्यांनी (महाराष्ट्रातील नव्हे) सोशल मीडियात त्या जाहीर केल्याचे उदाहरण आहे. हे सांगण्याचे निमित्त म्हणजे सध्या निवडणूक आयोग, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेली मतदारयाद्यांच्या शुध्दीकरणाची लढाई. आयोगाकडून या याद्या ‘शुध्द’ करण्याआधीच भाजपने त्याला जात-धर्माशी जोडत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
विरोधकांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मतदारयाद्यांमधील घोळाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला. त्याआधी विरोधी पक्षांतील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत याद्यांमधील त्रुटी दुरूस्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाकरे काका-पुतण्याने ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत याद्यांमधील अनेक घोळ जाहीरपणे मांडले. दुबार नावे, चुकीचे पत्ते, वय, नावांमधील चुका, एकाच ठिकाणी असलेली अनेक नावे... अशा एक ना अनेक त्रुटींवर बोट ठेवले. दोघांनीही सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाचे साटेलोटे असल्याचा आरोप केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या काळातील वाढलेल्या मतदारांच्या आकड्यांवर विरोधकांकडून बोट ठेवले जात आहे. आयोगाकडून यावर उत्तरे देण्यात आली आहेत. विरोधकांच्या भेटीगाठींनंतर आयोगाने दुबार मतदारांबाबत महत्वाचे पाऊल टाकत त्यांचा शोध सुरू केला आहे. या घडामोडी घडत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनीही सोमवारी पत्रकार परिषद घेत मतदारयाद्यांमध्ये त्रुटी असल्याचे पुराव्यांनिशी दाखवून दिले. विरोधकांपाठोपाठ सत्ताधारी भाजपनेही याद्यांमधील त्रुटी मान्य केल्या हे बरे झाले. त्यांनी एक नव्हे तर अनेक मतदारसंघातील त्रुटी दाखवून दिल्या.
शेलार यांनी या त्रुटी दाखविताना विरोधकांवर तुष्टीकरणाचे आरोपही केले. शेलारांनी मतदारयाद्यांमधील पुरावे दाखविताना जात-धर्माचा आसरा घेतला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला होता. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणत मतदारांना साद घातली होती. त्याचा फायदा निश्चितच भाजपला काही प्रमाणात झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्याचीच री ओढला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. पण त्यांची ही रणनीती भाजपवरच तर उलटणार नाही ना, असाही प्रश्न आहे.
मतदारयाद्यांमधील महत्वाच्या विषयातही भाजपने धर्माचा मुद्दा आणला आहे. मतदारयाद्यांमधील अनेक दुबार मुस्लिम मतदारांची नावे पुराव्यानिशी दाखवत शेलार यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. पण हे करत असताना त्यांनी निवडणूक आयोगालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. जे विरोधक म्हणत आहेत, तेच शेलारांनीही सांगितले. मात्र, त्यात एक मोठा फरक आहे. विरोधकांकडून केवळ ‘मतदार’ हा शब्द वापरला जात आहे, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. ज्यांची नावे दुबार आहेत, पत्ते अस्तित्वात नसलेले, चुकीची नावे... आदी त्रुटी दूर करून मतदारयाद्या शुध्द कराव्यात, असेच विरोधक म्हणत आहेत. पण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ एका विशिष्ट धर्मातील मतदारांची नावे शोधण्याचे ‘कठीण’ काम करत शेलारांना दारूगोळा पुरविला.
शेलार यांनीही मग केवळ धर्माचे हत्यार न वापरता भाषा आणि प्रांतवादाचे शस्त्र उपसले. पहिले बिहारी, मग उत्तर भारतीय मतदार, मग जैन मतदार, मग हिंदी भाषिक, मग गुजराती, आता भोईर पाटील??? हिंदू, मराठी आणि दलित यांच्याविरोधात भूमिका घेणार तुम्ही?, असे सवाल त्यांनी विरोधकांना केले. सत्याच्या मोर्चामधील असत्यासारखं नसून व्यावहारिक आणि उघड डोळ्यांनी दिसणारं सत्य आम्ही मांडतो आहोत. मतदारांमध्ये आम्ही भेद करु इच्छित नाही पण जे करतायत त्यांना उघड करु पाहतो आहोत. भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. Justice for all appeasement of none! म्हणजे “सर्वांसाठी न्याय, कोणालाही झुकते माप नाही," असे म्हणायला शेलार विसरले नाहीत. शेलारांना नंतर उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अन्य काही नेत्यांनीही जोरदार प्रत्युतर दिले. शेलारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच पप्पू केल्याची टीका ठाकरेंनी केली.
विरोधकांनी मतदारयाद्यांमध्ये भेद केल्याचा साक्षात्कार भाजप नेत्यांना अचानक झाला की त्यासाठी अभ्यासक कार्यरत होते, हे तेच सांगू शकतील. पण विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदार, मंत्र्यांकडून मतदारयाद्यांमधील त्रुटीबाबत सातत्याने बोलले जात आहे. मतदारयाद्या हा प्रत्येक निवडणुकीचा आत्मा असतो. त्या त्रुटीविरहित असायलाच हव्यात. त्या दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. विरोधकांकडून या त्रुटी दूर करण्याची मागणी होत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? राजकीय आरोप-प्रत्यारोप हे नेत्यांच्या पातळीवर ठीक आहे. पण प्रत्यक्ष मतदारांनाही त्रुटींचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
मतदान केंद्रापर्यंत जाऊनही अनेकांना नावे वगळल्यामुळे आपला हक्क बजावता येत नाही. दुबार मतदानाचे प्रकार घडल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. बोगस मतदारही यादीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असेल तर ती लोकशाहीची थट्टा केल्यासारखेच आहे. राजकारण बाजूला ठेवून या मुद्द्यावर केवळ राजकीय पक्षच नव्हे तर मतदारांनीही आपल्या हक्कासाठी पुढे यायला हवे. राजकीय पक्षांनी प्रचलित पध्दतीने आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. शेलार यांचेही तेच म्हणणे आहे. पण हे करत असताना जाती-धर्माच्या आडून एकमेकांवर चिखलफेक करणे कितपत योग्य आहे? पण भाजपने आगामी निवडणुकीसाठी आपली रणनीती स्पष्ट केल्याचे दिसते.
भाषावाद, प्रांतवाद आणि धार्मिक वाद या तीन मुद्यांवर भाजप निवडणुकीला सामोरे जाणार, हे निश्चित. त्याची तयारी हिंदीपासून सुरू झाली आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी भाषावाद आणि प्रांतवादाला खतपाणी घातले. त्याचे पडसाद प्रामुख्याने उत्तर भारतात उमटले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते अनेक मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून हिंदू विरुध्द मुस्लिम हा राग आधीपासूनच आळवला जात आहे. त्यात आज आशिष शेलार यांनी तेल ओतण्याचे काम केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या मुद्यांवर भाजप नेते आक्रमक असणार हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.