Balasaheb Patil, Manoj Ghorpade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : माजी सहकार मंत्र्यांना दुसरा दणका बसणार? 'सह्याद्री'साठी घोरपडेंनी बाह्या सरसावल्या

Balasaheb Patil : विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला.

Hrishikesh Nalagune

Karad : विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पाच टर्मचे आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवलं. आता पाटील यांना दुसरा दणका देण्यासाठी घोरपडे यांनी बाह्या सरसावल्या आहेत.

बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांची गेली अनेक वर्ष एक हाती सत्ता असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. जवळपास 60 हजार सभासद असलेल्या हा कारखाना अनेक वर्षांपासून बिनविरोध किंवा एकहाती होत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला.

कारखान्याच्या सभासदांची नाराजी पाटील यांना भोवल्याची चर्चा होती. याच नाराजीच्या लाटेवर स्वार होत कारखानाही ताब्यात घेण्यासाठी घोरपडे (Manoj Ghorpade) गटाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर घोरपडे गावोगावी संपर्क मेळावे घेत आहेत. "कारखाना म्हणजे बाळासाहेब पाटलांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे. या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून त्यांना बाहेर काढू" असा इशाराच घोरपडे यांनी दिला आहे.

"सर्वसामान्य सभासदांना न्याय देणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे विधानसभेची निवडणूक सर्वांनी हाती घेतली होती, त्याचप्रमाणे कारखान्याची निवडणूकही सभासद हाती घेतील. येत्या काळात कारखान्यावर सर्वसामान्य घरातील संचालक आणि चेअरमन राहतील" असा आशावाद घोरपडे गावोगावी देत आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवासराव थोरात, काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर समर्थकांनीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम :

21 संचालक निवडीसाठी 27 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर 6 मार्चला छाननी होणार असून 7 मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 5 एप्रिलला मतदान होणार असून 6 एप्रिलला कराडमधील छत्रपती संभाजी भाजीपाला मार्केटमधील नगरपालिका इमारतीत मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT