Solapur, 09 September : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. आमदार राऊत यांनीही आजही पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा प्रश्नांचा भडिमार केला.
शरद पवार यांच्या बार्शी दौऱ्यात माझ्यामध्ये आणि आमदार रोहित पवारांत शाब्दीक चकमक झाली होती. तेव्हापासूनच जरांगे माझ्याविरोधात बोलायला लागले आहेत. माझं घरंबिर पेटवण्याचा जरांगे पाटील यांचा विचार आहे काय..? असा सवाल आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपली मराठा आरक्षणाबाबातची भूमिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाची चळवळ वेगळ्या दिशेने भटकल्याचे दिसत आहे. आरक्षण घेत असताना उपोषण, मोर्चे, आंदोलन हे केलेच पाहिजे. मात्र चर्चेची दार उघडी असली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचंही अष्टप्रधान मंडळ होतं. मात्र, हे महाशय कोणाला बोलूच देत नाहीत.
जेव्हा शरद पवार बार्शीला (Barshi) आले, तेव्हा ते माजी मंत्री दिलीप सोपल यांना भेटले, त्यावेळी माझं आणि रोहित पवारांमध्ये (Rohit Pawar) शाब्दीक चकमक झाली होती. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील मला बोलत आहेत. तुम्ही नेमकी मराठा आरक्षणाची लढाई लढता की महाविकास आघाडीची लढाई लढता. आम्ही काय चूक केली आहे, असा सवाल आमदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावरील एसआयटीची चौकशी मागे घ्यावी, यासाठी महाराष्ट्रातून लढणारा मी एकमेव आमदार आहे. पण मी काही प्रश्न केले म्हणून मलाही खडाखडा बोलत आहेत. बार्शीतील मराठा आंदोलकाने तुम्हाला 11 प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे अगोदर द्या, असे आवाहन राऊत यांनी केले.
आमदार राऊत म्हणाले, रावणाची लंका राहिलेली नाही आणि दुर्योधनाचे काय झालं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे एवढा अहंकार कामाचा नाही. मराठा आरक्षणाची चळवलं अखंडपणे पुढे न्यायची का, काही वेगळं साध्य करायचं आहे, अशी शंका आता आमच्या मनात येऊ लागली आहे.
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्याचा एक ड्राफ्ट तयार करून घ्यावा आणि तज्ज्ञ मंडळींचा त्यात समावेश करून घ्यावा. आरक्षणाच्या मुद्यावर मी त्यांच्यासोबत आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.