Manoj Jarange Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : माझ्या टप्प्यात आला की वाजवलीच; मनोज जरांगेंचे भुजबळांना जशास तसे उत्तर

Sunil Balasaheb Dhumal

Satara Political News : मराठा आरक्षण लढ्याच्या अंबड या होमपिचवर ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा पार पडली. यातून ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा हट्ट सोडण्याचा सल्ला दिला, तर मंत्री छगन भुजबळांनी एकेरी उल्लेख करीत जरांगे पाटलांवर सडकून टीका केली. यावर जरांगेंनीही माझ्या टप्प्यात आला की वाजवलीच, असे प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ-जरांगेंच्या या शाब्दिक हल्ल्याने राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सरकारला दुसऱ्या वेळी २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यानच्या काळात जरांगे पाटील राज्यातील समाजातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी मोठ्या सभा होत आहे. साताऱ्यातील कराड येथे शनिवारी रात्री दीड वाजता सभा पाडली. या वेळी जरांगेंनी भुजबळांचा खरपूस समाचार घेतला.

'आतापर्यंत खूप सहन केले. यापुढे माझ्या नादी लागला तर सोडणार नाही,' असा हल्लाबोल भुजबळांनी जरांगे पाटलांवर केला होता. याला उत्तर देताना जरांगे म्हणाले, 'संध्याकाळी बघतो, उद्या दणका देतो, असे ते म्हणतात, पण सकाळपासून त्यांनी काही बघितले नाही. कोण कुणाच्या वाटेला जात नाही; पण माझ्या टप्प्यात आला की वाजवलीच. आमचे आंदोलने शांततेत सुरू आहेत. तुम्ही जर नादाला लागला तर आम्ही ५० टक्के आहोत,' असा इशारा देत 'त्यांचा जाती जातीत दंगली घडवायचा प्लॅन आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आवरावे,' असे आवाहनही केले.

आरक्षणाचे पुरावे लपवले

समितीने काम केले, त्यावेळी मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी नाहीत, त्यामुळे आरक्षण नाही, असे सांगितले जात होते. मात्र, जोर लावल्यानंतर सरकारला नमते घ्यावे लागले आणि समिती काम करायला लागली. आता समितीला लाखोने पुरावे सापडत आहेत. मराठा समाजाचे पुरावे होते तर ते कोणी लपवले, त्याचा शोध घेण्याची गरज आहे, असा आरोपही जरांगे पाटलांनी केला.

विटा बंद

जरांगे पाटलांनी विटा येथील सभेत आलेला अनुभव सांगितला. ते म्हणाले, 'आज एक विशेष घटना घडली. विट्यात सर्व जातीधर्मातील लोकांची घर दुकाने बंद होती. सगळे लोक कार्यक्रम ठिकाणी होते. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडले.' तर कराड येथे रात्री थंडीतही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाला उशिरा पोहाेचल्याने जरांगेंनी त्यांची माफीही मागितली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT