Anna Dange-Uttam Jankar-Ramhari Rupanwar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha-Dhangar Reservation : ‘माधवं’नंतर महाराष्ट्रात ‘मध’चा प्रयोग; जरांगेंच्या भूमिकेमुळे धनगर समाजाच्या मागणीला बळ

प्रमोद बोडके

Solapur News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्र सध्या स्थित्यंराच्या उंबरठ्यावर उभा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे राजकीय समीकरणांबरोबरच सामा्जिक समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी माधवं (माळी, धनगर, वंजारी) यशस्वी प्रयोग केला होता. आता मराठा आंदोलन उभारणारे जरांगे पाटील यांनीही चौंडीत जाऊन पुन्हा ‘मध’ (मराठा-धनगर) आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेला धनगर समाजाचे नेते कसा प्रतिसाद देतात, यावर ‘मध’चे यश अवलंबून आहे. (Maratha-Dhangar Reservation : Maratha community Support to Dhangar community on the issue of reservation)

यशवंत सेनेच्या पुढाकाराने यंदा चौंडी येथे विजयादशमीला धनगर समाजाचा पहिलाच दसरा महामेळावा झाला. या मेळाव्यासाठी राज्यातील धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे, माजी मंत्री राम शिंदे, बाळासाहेब दोडतले यांच्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील लढवय्या नेते उत्तम जानकर आणि माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर सहभागी झाले होते. या मेळाव्यातील जरांगे पाटील यांच्या भाषणासोबत ॲड. रुपनवर यांच्या भाषणाचीही विशेष चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर समाज निर्णायक भूमिका बजावणारा घटक आहे. त्यातही सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील काही मतदारसंघांत मराठा समाजाच्या बरोबरीने मतदारसंख्या आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, मोहोळ, पंढरपूर, करमाळा या पाच विधानसभा मतदारसंघांत मराठा व धनगर मते समान आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक महत्त्वपूर्ण ठरतात.

सोलापुरातील अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर या मतदारसंघांत धनगर समाजाच्या मतांचा टक्का मोठा आहे. या विधानसभा मतदारसंघांबरोबरच सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतील विजयाची किल्ली धनगर समाजाच्या हाती आहे. त्यामुळे चौंडीत जरांगे पाटील यांनी मांडलेल्या ‘मध’चा सर्वाधिक परिणाम सोलापूर, माढा, बारामती या लोकसभा मतदारसंघांबरोरच सोलापूर जिल्ह्यातील आठ विधानसभा निश्चितपणे जाणवल्याशिवाय राहणार नाही.

गृहीत धरणे अंगलट

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे प्रस्थापित मराठा समाजील नेत्यांची अडचण झाली आहे. मी मराठा समाजाचा असून, आमदार-खासदार आहोत. आरक्षणाबाबत तुम्ही आम्हाला काय सांगता? अशी भाषा बोलणाऱ्या नेत्यांची मोठी पंचाईत झाली आहे. समाजाला गृहीत धरण्याची भूमिका या नेतेमंडळींची अंगलट येताना दिसत आहे. अनेकांना त्याचा नुकताच फटका बसला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना आगामी निवडणुकीची चिंता लागून राहिली आहे.

‘मध’चे यश धनगर नेत्यांच्या हाती

धनगर समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला मंत्र धनगर समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याची जबाबदारी डांगे, राम शिंदे, दोडतले यांच्याबरोरच राज्यातील स्थानिक नेतृत्वावर असणार आहे. धनगर आरक्षणाचा लढा उभारणे उत्तम जानकर आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे ॲड. रुपनवर यांनाही त्यासाठी प्रयत्न करावे लाणार आहेत. ‘माधवं’च्या यशानंतर आता राज्यात ‘मध’चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी जबाबदारी या नेत्यांना हाती घ्यावी लागणार आहे, तर आरक्षणाचे घोडे गंगेत न्हाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT