Maratha Reservation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनाला मिळणार शाहिरी आवाज... कोल्हापूरचा चित्ररथ मुंबईकडे रवाना

Rahul Gadkar

Kolhapur News : शाहीर दिलीप सावंत यांच्या खणखणीत शाहिरीसोबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा चित्ररथ मुंबईकडे रवाना झाला. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. हा निर्धार करूनच कोल्हापुरातून हजारो मराठाबांधव त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी  मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. कोल्हापूरच्या झोंबणार यांना आता मिरच्या...  सत्ताधाऱ्यांनो, सांभाळा आता तुम्ही खुर्च्या... असा शाहिरी पोवाड्याचा आवाज करीत हा चित्ररथ मार्गस्थ झाला. (Chitrarath of Kolhapur leaves for Mumbai; Support for Jarange Patil's movement)

राज्य सरकारने मराठ्यांना एक तर ओबीसीमधून आरक्षण द्यावे; अन्यथा आम्हाला गोळ्या घालाव्यात, हाच निर्धार मराठा कार्यकर्त्यांचा आहे,’ असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले. ‘कोल्हापूर ही आरक्षणनगरी आहे. छत्रपती शाहूंच्या आरक्षणनगरीतून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना होत आहेत. कोल्हापुरातील गावागावांतून हजारो कार्यकर्ते स्वतःचा शिधा घेऊन वाहनांतून रवाना झाले आहेत. प्रशासनाने  कार्यकर्त्यांना  दिलेल्या नोटिशी आम्ही मानत नाही, या नोटिशींची होळी करून जाणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून शाहीर दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली चित्ररथ मुंबईला रवाना झाला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’चा जयघोष करीत वाजतगाजत कार्यकर्ते मुंबईकडे निघाले. मुंबईतील आंदोलनात आता कोल्हापूरच्या शाहिरीचा पहाडी आवाज घुमणार आहे.

गडहिंग्लजमधील मराठाबांधव धडकणार

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडहिंग्लजमधून मराठाबांधव मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्धार समाजाच्या बैठकीत करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुधीर ऊर्फ अप्पा शिवणे यांनी ही बैठक निमंत्रित केली होती. या आंदोलनाला राज्यभरातील मराठा समाजबांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनात सक्रिय सहभागासाठी समाजबांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यात गडहिंग्लजकरांनीही मागे राहायचे नाही, असा निर्धार करून मराठाबांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर धडक मारण्याचा निर्णय घेतला.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT