maratha reservation issue Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपती खवळले; ... म्हणून सर्वपक्षीय बैठकीला राहिले अनुपस्थित

Maratha Andolan All Party Meeting In Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. आरक्षण कसं मिळवता येईल? यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीवरून संभाजीराजे छत्रपतींनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीका केली आहे.

Rahul Gadkar

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणाला लागलेले हिंसक वळण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत झालं. तसंच जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन केलं. आता या बैठकीवर संभाजीराजे छत्रपती यांनी सडकून टीका केली आहे.

आज सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण या विषयावर बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीस छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली.

मराठा आरक्षणविषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर त्यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र संभाजीराजे छत्रपती सोडले आहे.

सर्वपक्षीय बैठकीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते. मात्र, मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला, असे त्यांनी म्हटले.

पण सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळीदेखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा देत संभाजीराजे छत्रपतींनी संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT