Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange News : जरांगे-भुजबळांमध्ये वात पेटली; "शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना समज द्यावी." : जरांगे आक्रमक

Maratha Reservation : अन्य लोकांना पुढे करून ते आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Mangesh Mahale

Dharashiv : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद मिटत नसल्याचे दिसते. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज द्यावी," असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते धाराशिव येथे पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ-जरांगे पाटील वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

"मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. मात्र, ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे, त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, असे माझे म्हणणे आहे. माझ्या एकट्याचेच नव्हे, तर इतर अनेक नेत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे इतरांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाहीत?, असा सवाल करत मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला, नाही तर त्याला राजकीय वास येईल, असे भुजबळांनी जरांगे पाटलांना सुनावले होते. त्याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"आम्ही शांततेच्या मार्गाने कार्यक्रम घेत आहोत, पण भुजबळ वातावरण दूषित करीत आहेत. अन्य लोकांना पुढे करून ते आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, कारण ते सत्ताधारी आहेत," असा आरोप जरांगेंनी त्यांच्यावर केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय समता परिषदेकडून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्या सभेला बंदी घालण्याचीदेखील मागणी करण्यात आली आहे. याला उत्तर देताना जरांगे पाटलांनी हे विधान केलं आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून लोकं अंगावर घालण्याचे उद्योग करू नका, असेही जरांगे पाटलांनी भुजबळांना या वेळी सुनावलं. जरांगे पाटलांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

मनोज जरांगे पाटलांची उद्या (६ ऑक्टोबर) जामखेड येथे सभा होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी नगरच्या एमआयडीसी येथे सभा होणार आहे. या सभेची आणि जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तरी सध्या नगर येथे सुरू आहे. यासाठी १०० हून अधिक समन्वयक काम करीत आहेत. आरक्षणासाठी आम्ही जरांगे पाटील यांचे पाठीमागे खंबीर उभे राहणार असल्याचे या वेळी समन्वयकांनी सांगितले आहे.

सोलापुरात स्वागत, नगरमध्ये बॅनर झळकले...

प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई असणार आहे, असे समन्वयकांनी सांगितलं आहे. अहमदनगर शहराच्या सर्व बाजूंनी आता मनोज जरांगे यांच्या सभेचे जाहिरातीचे मोठमोठे बॅनर्स झळकू लागले आहेत. जरांगे पाटलांचे आज सोलापुरात मोठे स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदेनी क्रेनच्या साह्याने जरांगे पाटलांना पाचशे किलोचा हार घातला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT