Kupwad MD Drug Seized Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune Drug Connection : महिनाभरापूर्वीच भाड्याने घेतलेल्या खोलीतून 300 कोटींचे एमडी ड्रग्ज केले जप्त

Sangli-Kupwad Drug Seized : कुपवाड शहरातील स्वामी मळा परिसरात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये 140 किलो ‘एमडी’ ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला.

Anil Kadam

Sangli News : पुण्यात अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे आता सांगलीपर्यंत येऊन पोचली आहेत. कुपवाड येथील ड्रग्जसाठ्यावर पुणे क्राइम ब्रँच आणि सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापेमारी केली. या ठिकाणी पोलिसांनी तब्बल १४० किलो एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जचा साठा हस्तगत केला आहे. याची बाजारभावाप्रमाणे 280 ते 300 कोटी रुपये किंमत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. (Sangli-Kupwad Drug Case)

या प्रकरणी पोलिसांनी आयुब अकबरशा मकानदार (वय 44, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) याच्यासह रमजान हमीद मुजावर (वय 55, रा. नुरइस्लाम मशीदजवळ, कुपवाड), अक्षय चंद्रकांत तावडे (वय 30, रा.बाळकृष्णनगर, कुपवाड) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिली. या वेळी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा व कुपवाड एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील उपस्थित होते. (Pune Crime Branch)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात पोलिसांनी 19 फेब्रुवारी रोजी कारवाई केली होती. पुण्यातील एकाकडे पावणे दोन किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर पुण्यातील क्राइम ब्रँचने सखोल चौकशी केली. संशयिताकडून सांगलीतील काही नावे समोर आली आहेत. त्या अनुषंगाने खात्री करण्यात आली. त्यानुसार अमली पदार्थाचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची खात्री झाल्यानंतर आज पुणे क्राइम ब्रँचचे पथक कुपवाडमध्ये दाखल झाले. (Pune Police)

कुपवाड शहरातील स्वामी मळा परिसरात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये 140 किलो ‘एमडी’ ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावातील किंमत जवळजवळ 280 ते 300 कोटींपर्यंत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मळ्यात भाड्याची खोली

संशयित आयुब मकानदार याने महिनाभरापूर्वीच स्वामी मळा परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. संशयित आरोपी हा ड्रग्ज तस्करी प्रकरणी येरवडा कारागृहात सात वर्षे होता. तो २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. जेलमध्ये त्याची ड्रग्जमाफियाबरोबर ओळख झाली होती. या साखळीतून त्याची ओळख होऊन त्याने हा साठा शहरातील भाड्याच्या खोलीत ठेवला असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली.

संशयित माजी सचिव

संशयित आयुब मकानदार याच्यावर ड्रग्ज प्रकरणात 2013 मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी तो कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सचा सचिव म्हणून कार्यरत होता. ड्रग्ज प्रकरणात त्याचा सहभाग आल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा त्याचे नाव आल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.

2011 मध्ये मोठी कारवाई...

कुपवाडमध्ये यापूर्वी 2011 मध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. कामूद ड्रग्ज कंपनीने परवानगीचे उल्लंघन करून केटामाईनचे उत्पादन केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी कंपनीच्या संचालकासह इतरांची चौकशी करण्यात आली होती. त्यापैकी काही जण अद्यापही कारागृहात आहेत. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणाची खळबळ कुपवाडमध्ये सुरू झाली. आयुब याचे नाव दहा वर्षांपूर्वी पुढे आले होते. आता पुन्हा ड्रग्ज प्रकरणाने डोके वर काढले आहे. यातील मास्टर माइंडपर्यंत पोहाेचणे पोलिसांसाठी आव्हान असेल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT