Sanjay Gaikwad Over Govind Pansare and Shivaji Kon hota book sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : शिवरायांचा नक्की कोणता वारसा पुढे नेत आहात? दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेनं शिवराळ संजय गायकवाडांना झाप झाप झापलं

Medha Pansare On Sanjay Gaikwad Over Govind Pansare and Shivaji Kon hota book : 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट प्रकाशकाला फोनवरुन शिवीगाळ केली. तसेच दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरले.

Aslam Shanedivan

  1. ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादात मेधा पानसरेंनी संजय गायकवाडांना प्रत्युत्तर दिले.

  2. गोविंद पानसरे यांच्या विचारसरणीवर टीका करणाऱ्यांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

  3. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चा रंगली आहे.

Kolhapur News : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता', या पुस्तकाच्या शीर्षकावरून अनेकदा वाद झाले आहेत. पण आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तब्बल 37 वर्षांनंतर यावरून वाद निर्माण केला आहे.

त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरले. यावरून आता कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

दरम्यान संजय गायकवाड यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेचा निषेध करताना पानसरे यांची सून मेधा पानसरे यांनी तीव्र शब्दात सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, पानसरे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून त्यांचे विचार तुम्हाला मारता येणार नाहीत. तर त्यांच्या विचारांना प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे तुल्यबल विचारच नाही, त्यामुळेच असे शब्द वापर आहात असे खडे बोल सुनावले आहेत.

आमदार संजय गायकवाड यांनी, पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवराळ भाषेत धमकावले. ते म्हणाले, अरे छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा हा गोविंद पानसरे कोण? तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं? त्याची अवस्था काय झाली? तुलाही घरात घुसून मी मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन.

यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले असून कोल्हापुरसह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मेधा पानसरे यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. गायकवाड यांनी पानसरे यांच्याबाबत ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीब रयतेचे राजे होते. पण गायकवाड त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत अशी भाषा वापरत आहेत. यामुळे ते नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? असा सवाल मेधा पानसरे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच हा गोविंद पानसरे कोण? असे म्हणणाऱ्या गायकवाड यांना फटकारत, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता', हे पुस्तक राज्याच्या कानाकोपऱ्यात वाचले जात आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या असून त्या वाटल्या गेल्या आहेत. यामुळे कॉम्रेड पानसरे यांनी जो विचार सांगितला, तो मारता येत नाही. त्याला विरोध करणारा तसा तुल्यबल विचार तुमच्याकडे नाही, असे म्हटलं आहे.

संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचावं, केवळ पुस्तकाचे शीर्षक बघून असे वक्तव्य करू नये. हे पुस्तक त्यांनी वाचावे असे आवाहन करत असल्याचेही मेधा पानसरे यांनी म्हटले. तसेच त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेत असल्याचेही म्हटलं आहे. तसे झाल्यास शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढू शकतात.

FAQs :

1. हा वाद कशामुळे निर्माण झाला?
‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला.

2. मेधा पानसरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी संजय गायकवाड यांना सडेतोड आणि सौम्य भाषेत प्रत्युत्तर दिले.

3. गोविंद पानसरे कोण होते?
ते एक प्रख्यात विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते.

4. संजय गायकवाड यांनी काय केले होते?
त्यांनी पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती.

5. या वादाचा परिणाम काय झाला?
राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT