Satara Dcc Bank Election- Jaykumar Gore-Prabhakar Garge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank : सातारा जिल्हा बॅंकेत 25 वर्षांची इनिंग खेळणाऱ्या प्रभाकर घार्गेंना रोखण्याचे मंत्री जयकुमार गोरेंपुढे चॅलेंज : घार्गेंनीही शांतपणे टाकला महत्वाचा डाव...

Khatav Political News : सातारा जिल्हा बँकेच्या खटाव सोसायटी मतदारसंघात भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सलग 25 वर्षे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना रोखण्याचे आव्हान मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर आहे.

​आयाज मुल्ला

Satara, 13 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेला खटाव तालुका सोसायटी मतदारसंघ भाजपच्या रडारवर आहे. खटाव तालुक्यातून विविध प्रवर्गातून भाजपने आपले शेलके मोहरे पुढे आणले असले तरी चुरशीच्या सोसायटी मतदारसंघात सलग 25 वर्षे बँकेत प्रतिनिधीत्व करीत असलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना रोखण्याचे चॅलेंज ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यापुढे असणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध मतदार संघातून तालुक्यातील तब्बल २४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, बाजार समितीचे माजी सभापती सी. एम. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे, धनंजय चव्हाण, निमसोडचे भाजप नेते नंदकुमार मोरे, औंध गटाचे युवा नेते योगेश फडतरे, इंदिरा घार्गे, सुनीता कदम, राजेश्वरी देशमुख, प्रीती घार्गे-पाटील यांचा समावेश आहे.

माजी आमदार घार्गे यांनी सलग २५ वर्षे बँकेत प्रतिनिधीत्व केले आहे. याशिवाय इतर मागासवर्ग प्रवर्गातून प्रदीप विधाते व भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गातून प्रा. अर्जुनराव खाडे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.

विविध मतदारसंघातून मातब्बरांनी अर्ज दाखल केले असले तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची खरी कसोटी सोसायटी मतदारसंघातच दिसून येणार आहे. घार्गे यांनी स्वत:बरोबरच पत्नी इंदिरा घार्गे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. घार्गे यांच्या विरोधात भाजपमधून आमदार धैर्यशील कदम यांच्या पत्नी, माजी सभापती सुनीता कदम, कातरखटाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, निमसोडचे भाजप नेते नंदकुमार मोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया अजून दूर असली तरी यापैकी कोणाची उमेदवारी अंतिम राहील, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रभाकर घार्गे हे बँकेच्या कारभारात अभ्यासू संचालक म्हणून परिचीत आहेत. याकाळात त्यांनी बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांचा सोसायटी मतदारसंघावर कायम दबदबा राहीला आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची अनुपस्थिती असतानाही त्यांनी मिळविलेला विजय ऐतिहासिक मानला जातो.

प्रभाकर घार्गे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सहकारी नंदकुमार मोरे यांनी घार्गे यांच्याशी फारकत घेत ‘आता बदल हवा... चेहरा नवा’ अशी या साद देत २०२१ मध्ये सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत घार्गे यांना ५६, तर मोरे यांना ४६ मते मिळाली होती. मोरे यांचा दहा मतांनी पराभव झाला असला तरी गतनिवडणुकीचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. धनंजय चव्हाण, सुनीता कदम यांना जिल्हा बँकेची निवडणूक पहिलीच असली तरी त्यांचा राजकारणाचा अनुभव व राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे.

घार्गे यांच्याविरोधात कोणाची उमेदवारी राहणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मर्जीतील कार्यकर्त्याच्या नावे सोसायटीचा ठराव करण्यापासूनच बँक निवडणुकीसाठी मतांची गोळीबेरीज सुरू झाली आहे. तालुक्यातील एकूण १०३ पैकी वडूज सोसायटी वगळता १०२ सोसायट्यांचे ठराव झाले आहेत. पण घार्गे यांना रोखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा खटाव, माण हा मतदारसंघ आहे. मंत्री गोरे यांनी गेल्या वीस वर्षांच्या काळात गावपातळीवरील अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात संधी दिली आहे. शिवाय गाव पातळीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद अश्या निवडणुकीत ते विशेष लक्ष ठेवून असतात. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूकीच्या माध्यमातून तालुक्यावरील वर्चस्वाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहण्याची शक्यता आहे.

खटावमधून जिल्हा बॅंकेसाठी दाखल झालेले अर्ज

औद्योगिक विणकर व मजूर सहकारी संस्था : सी. एम. पाटील, विक्रम जाधव, रणजित जाधव, हणमंत गायकवाड.

नागरी बँका, पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था : आमदार धैर्यशील कदम, सुरेंद्र गुदगे.

विकास सेवा सोसायटी मतदारसंघ : प्रभाकर घार्गे, धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, इंदिरा घार्गे, सुनीता कदम.

राखीव

विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग सदस्य : रणजित जाधव, शकुंतला साबळे, नवनाथ वलेकर.

इतर मागासवर्ग : प्रदीप विधाते, योगेश फडतरे, रज्जाक ऊर्फ राजूभाई मुलाणी, सचिन माळी, संदीप पाचांगणे.

अनुसूचित जाती किंवा जमाती सदस्य : सत्यवान कांबळे.

कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था : राजेश्वरी रणजितसिंह देशमुख.

महिला प्रतिनिधी : राजेश्वरी देशमुख, प्रीती घार्गे-पाटील, शशिकला देशमुख.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT