

Satara, 13 October : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रदीर्घ काळानंतर सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. बॅंकेच्या निवडणुकीबाबत बोलताना ‘अध्यक्ष भाजपचाच होईल’, असे सांगून सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे लाईन चालवली आहे, त्यातून त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना डिवचण्याचे काम केल्याचे मानले जात आहे. आता महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कऱ्हाड येथे भाजपची सभा झाली. त्यानंतर गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, परिस्थिती कशीही असो, जिल्हा बँकेत भाजपचाच अध्यक्ष होईल, यावर आम्ही ठाम आहोत. सध्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही समन्वय साधत आहोत. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह ॲड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा बँकेच्या संचालकांमध्ये निश्चितपणे समावेश असेल.
दरम्यान, यावेळी त्यांनी औपचारिक गप्पामंध्य बऱ्याच गोष्टींचा खुलासाही केली. सगळंच तुम्हाला सांगत बसलो तर त्याला काय अर्थ राहणार नाही, अशी टिपण्णीही मंत्री गोरे यांनी केली.
मंत्री गोरे म्हणाले, जिल्हा बॅंकेसाठी सध्या २५० अर्ज आहेत. जागा २५, त्यामुळे सरासरी दहा वीस अर्ज एका जागेसाठी आहेत, असे गृहीत धरा. त्यामुळे त्यावर बोलणे चालू आहे. महायुती म्हणून आमच्या वरिष्ठांकडून जशा सुचना येतील, त्यानुसार आम्ही भूमिका घेऊ. त्यांनी दिलेल्या पर्यायांवरही आमची चर्चा सुरू आहे.
जखमा कितीही चिघळल्या किंवा वरवर बऱ्या झाल्या तरी त्या पूर्ण बऱ्या होण्यासाठी प्रेमही करावे लागते. त्यामुळे जसे प्रेम वाढले, तशा जखमांचे व्रणही भरून येतील. वास्तविक त्या जखमा ज्यांनी दिल्या. त्यांना तो दोष जातो, यामध्ये भाजप म्हणून आमची भुमिका शून्य आहे, असे सांगून जिल्हा परिषदेतील घडामोडीवर भाष्य करत त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंवर टिपण्णी केली.
जयकुमार गोरे यांनाच विरोधकांकडून टार्गेट केले जाते का, या प्रश्नावर गोरे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत संघर्ष आहे. मुख्यमंत्री फडणवीस आमचे नेते आहेत. त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आताच्या निवडणुकीत विरोध कोठे जास्त आहे, त्यालाच विरोधक टार्गेट करत आहेत.
सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीतही तेच झाले. धैर्यशील कदम यांच्या विरोधात उमेदवार याच जिल्ह्यातील दिला. त्यामुळे येथे लक्ष घालून तीच ताकद कमी केल्यास बाकीच्या ठिकाणी विजय खेचण्याचा विरोधकांचा प्रयत्न आम्ही येथेच हाणून पाडण्याची तयारी केली आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.