Shambhuraj Desai Vs Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : ''खोटारडे कोण हे 'SIT' चौकशीतून...'' ; शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना सूचक इशारा!

Vishal Patil

Satara News : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि सध्याचे सत्तेवर बसलेले राजकारणी खोटारडे असून सध्या टेंडरबाजी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी सातारा येथे प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिका टेंडरचा भांडाफोड केल्याने लवकरच एसआयटी चौकशीतून खोटारडे कोण समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच मुख्यमंत्री भाजपाची भाषण वाचून दाखवत असून कोणावर आपण बोलतोय याचं भान नसल्याची टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांनी(Sanjay Raut) केली होती. या टीकेला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले, ''आम्ही हिंदुत्वाची भाषा बोलत असून ज्याविरूध्द शिवसेना प्रमुख होते, त्यांना सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही मांडीवर घेवून बसला आहात.''    

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर, ''मुंबई महानगरपालिकेत(BMC) कशा पध्दतीने या अगोदर एकाच व्यक्तीला 300-500 कोटींची कंत्राटं दिली जात होती आणि त्यामध्ये बोगसगिरी झाल्याचा सगळा भांडाफोड मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सभागृहात केला आहे. या बोगस कंत्राटांना कोणाचा आशीर्वाद होता? कुणाच्या सांगण्यावरून होत होते हे सगळे समोर आलेलं आहे. सध्यास्थितीत मुंबई महापालिकेतील गैरकारभाराची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. तेव्हा खोटारडं कोण आहे, कुणी महापालिकेला ओरबाडण्याचं काम केलं तो सर्व प्रकार चौकशीतून समोर येईल.'' असंही यावेळी देसाईंनी म्हटलं.

संजय राऊत रोज आठच्या भोंग्याला येतात आणि.... -

याशिवाय ''संजय राऊत सकाळी आठ वाजेच्या भोंग्याला येतात आणि जे काही बोलतात त्यामध्ये कुणाबद्दल चांगल बोलेलं मला काही आठवत नाही. कुणावरती तरी टीका करायची आणि मी फार मोठा विश्वज्ञानी आहे अशा अविर्भावात दुसऱ्यावरती टीका करण्यापलिकडं संजय राऊतांना काम नसतं. ते नेहमीच तथ्यहीन बोलत असतात.

तेव्हा अशा बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांनी कोणाला खोटारडं म्हणू दे किंवा आणखी काही म्हणून दे. आम्ही काम करणारी माणसं आहोत. गेल्या दीड वर्षांत किती गतीने काम सुरू आहे, त्यामुळे आम्ही टीका करणाऱ्या संजय राऊतांना जास्त चांगल्या विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देवू.'' अशा शब्दांत शंभूराज देसाईंच्या टीकेवर पलटवार केला.    

शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व तुम्ही विसरला आहात, त्यामुळे... -

''भाजपचं भाषण वाचून दाखवायचा प्रश्नच येत नाही. भाजप- शिवसेनेची युती खुप जुनी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी ही युती केली होती. ती युती मध्यंतरी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी खंडित झाली होती. ती युती आम्ही पुढे नेली. तेव्हा आम्ही भाजपाची भाषा बोलतोय म्हणणं चुकीचे आहे.'' असंही देसाईंनी म्हटलं आहे.

तसेच, ''आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेली हिंदुत्वाची भाषा बोलतोय. उलट तुम्ही ती भाषा विसरला आहात. शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्व तुम्ही विसरला आहात. त्यामुळे आम्ही काय बोलतोय याच्यावर भाष्य करण्याचा अधिकारच तुम्हाला राहिलेला नाही. ज्यांच्याविरूध्द आयुष्यभर शिवसेना प्रमुख राहिले, त्यांना जवळ घेणार नाही. त्यांच्यासोबत जाणार नाही, म्हटले त्यांना तुम्ही मांडीवर घेवून बसला आहात.'' अशीही टीका ठाकरे गटावर मंत्री देसाई यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT