Nanded News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जसजसा जवळ येत आहे, तसतशी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची चर्चा जोर धरू लागली आहे. महायुतीमधील महत्त्वाचे नेते त्यासंदर्भात मौन बाळगून असले तरी आमदार मात्र त्याबाबत भाष्य करताना आढळून येतात. विशेषतः एकनाथ शिंदे हे अपात्र ठरणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत आमचे मुख्यमंत्री राहतील, असे म्हटले आहे. (In BJP CM post is decided by party leader : Chandrashekhar Bawankule)
भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हे आमच्या पक्षाचे केंद्रीय नेतृत्व ठरवते. आता आमची एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुती आहे. महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री बनेल, ही नंतरची गोष्ट आहे. आता मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच नाही. कारण, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांकडील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता त्यावरील निकाल येणे अपेक्षित आहे. तो निकाल काय असेल, याचा अर्थ जो तो आपापल्या परीने लावत आहे. मात्र, महाविकास आघाडीतील पक्षांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 16 आमदार अपात्र ठरणार, असे छातीठोकपणे सांगत असतात. पण, महायुती म्हणून सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. पण, आमदार आपापल्या नेत्यांच्या नावाची चर्चा करत असतात.
एकनाथ शिंदे हे अपात्र ठरणार असून त्यांचे मुख्यमंत्रिपद जाणार, असे ठाकरे सेनेचे नेते रोज सांगत आहेत. शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागणार आणि त्या खुर्चीवर अजित पवार बसणार, असा दावा काही आमदार करत होते. मात्र, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हा निकाल जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांना सोबत येताना मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे सांगितले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही 2024 पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी राहतील, असे स्पष्ट केले आहे.
(Edited By : Vijay Dudhale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.