Shambhuraj Desai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : 'तुमचं शिष्टमंडळ दावोसला काय करत होतं, सांगायची वेळ आणू नका'; देसाईंचा ठाकरेंना इशारा

Vishal Patil

Satara News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोसच्या दौऱ्यावर गेलेले असताना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर होणाऱ्या कारवाईमुळे आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करत दावोसमधील फोटो मिळाले असून मुख्यमंत्री दलालांना घेऊन गेल्याचा आरोप केला होता. यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना इशारा दिला आहे.

गेल्या सरकारच्या काळात दावोसमध्ये परिषद संपल्यानंतर शिष्टमंडळ काय करत होते, हे सांगायची वेळ आणू नका, असे ते म्हणाले. कराड येथे मंत्री शंभूराज देसाई यांनी दावोस दौरा, शरद पवार ईडी विरोधात कोर्टात जाणार असल्याच्या माध्यमाच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, रणजित पाटील, गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्याचे सरकार ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला जात असून या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर शंभूराज देसाई म्हणाले, या यंत्रणा स्वतंत्र आहेत. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नसतो, मी स्वतः अडीच वर्ष गृहराज्यमंत्री होतो. मला त्याची माहिती मिळत होती. मात्र, कोणीही या यंत्रणांना कारवाईसाठी सांगू शकत नाही. त्या स्वतंत्र आहेत, शरद पवार साहेब मोठे आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, असं ते म्हणाले.

'गुंतवणूकदारांना दलाल म्हणणं योग्य नाही...'

दावोसमध्ये उद्योगांच्या प्रतिनिधींना भेटणे म्हणजे दलालांना भेटणे हे आदित्य ठाकरे कशाच्या आधारावर म्हणाले. मागील सरकारमधील शिष्टमंडळ दावोस दौरा संपल्यावर मागे थांबून काय करत होते, हे उघड करावयास लावू नका, असा पलटवार शंभूराज देसाई यांनी केला.

परकीय गुंतवणूक आणण्यासाठी प्रतिनिधींना, गुंतवणूकदारांना नेले असल्याने त्यांना दलाल म्हणणं योग्य नाही. यापेक्षा विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी एक विधान केले होते. त्याप्रमाणे दावोसची परिषद संपल्यानंतरही शिष्टमंडळ काय करत होते, यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य करावे,असे मंत्री देसाई म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते ?

दावोस दौऱ्याचे फोटो आपल्याकडे आल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे “मुख्यमंत्र्यांना सध्या दावोसमध्ये थंडी एन्जॉय करुद्या. ते महाराष्ट्रात आल्यावर आम्ही वातावरण गरम करु. आमच्याकडे सर्व फोटो आले आहेत”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT