Miraj Politics: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना होण्याची शक्यता असल्याने, सांगलीतील मिरजच्या राजकारणात अचानक आक्रमकता आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना यशस्वीपणे हाताळत चार वेळा आमदार झालेले सुरेश खाडे यांनी आपले धोरण अचानक बदलले आहे. ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना तुटून पडताना दिसत आहेत.
दुसरीकडे, सांगली सोबतच मिरजेच्या मैदानावर खासदार विशाल पाटील यांना आपले राजकीय नेतृत्व पुढे न्यायचे आहे. त्यामुळे त्यांनीही आमदार खाडे यांना उघड आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळापासून सुरू झालेला हा संघर्ष आता मिरज पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभात एकमेकांचा थेट ‘बाप’ काढण्यापर्यंत टोकाला पोहोचला आहे.
सुरेश खाडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना लोकसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत विशाल पाटील यांना मिरज विधानसभा मतदारसंघात तब्बल २५ हजारांचे मताधिक्य मिळाले आणि हीच गोष्ट खाडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या धक्कादायक निकालामुळेच पुढे त्यांना पुन्हा मंत्रिपदी संधी मिळाली नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्रत्यक्षात मात्र विशाल पाटील यांनी खासदार झाल्यानंतर सुरुवातीला खाडे कुटुंबाशी सौख्य वाढवले होते. त्यांनी अगदी सुमन खाडे यांच्याकडून राखी देखील बांधून घेतली होती. या दरम्यान मिरज विधानसभेला खाडे विरुद्ध मोहन वनखंडे असा सामना रंगण्याची अपेक्षा असतानाच वनखंडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामागे खाडे आणि विशाल यांच्यातील हेच सौख्यपर्व कारणीभूत आहे का, अशीही कुजबूज त्यावेळी रंगली होती.
परंतु, पुढे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विशाल पाटील यांनी खाडे यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक मांडणी केली. त्यांनी मोहन वनखंडे यांना पुन्हा आपल्या सोबत घेतले आणि मिरज पंचायत समितीतून खाडे यांची सत्ता उलथून टाकली. त्यासाठी एका सदस्याचे अपहरण करण्यापर्यंत प्रकरण ताणले गेले. या राजकीय खेळात खाडे यांची महायुतीनेही कोंडी केली; ज्यामध्ये आमदार इद्रिस नायकवडी, माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे ही सारी मंडळी खाडे यांच्या विरोधात एकवटली. त्यामुळे आतापर्यंत ‘सबका साथ-सबका विकास’ या धोरणाने विरोधकांनाही हाताळणारे खाडे आता मात्र एकटे पडले असून त्यातूनच त्यांची आक्रमकता वाढत गेल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, २०२९च्या विधानसभेआधी मतदारसंघ पुनर्रचना झाली तर मिरज मतदार संघ ‘खुला’ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशाल पाटील आपले राजकीय डाव टाकताना दिसत आहेत. पूजा पाटील यांचा मिरज मतदारसंघातील वाढलेला संपर्क हे त्याचेच लक्षण मानले जात आहे. दुसरीकडे, आमदार इद्रिस नायकवडी यांनी अजितराव घोरपडे यांच्याशी इतके जुळवून घेतले आहे की, त्यात भविष्यातील मिरज पूर्व भागाच्या बेरजेची गणिते दिसत आहेत. नायकवडी यांनाही मिरजेत आपला तंबू रोवायचा असल्याने ते खाडे यांच्या विरोधातील आक्रमक राजकारणात पुढे आहेत.
विशेष बाब म्हणजे, मतदार संघ खुला झाला तरी या जागेवर माझाच दावा राहील, कारण हा मतदार संघ २० वर्षे मजबुतीने मी बांधलाय, असा दावा सुरेश खाडे यांनी केल्याची चर्चा आहे. तसेच महिला आरक्षणाचा विषय आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून खाडे यांनी आपली सून स्वाती यांची राजकारणात एंट्री घडवून आणली आहे. या सर्व बदलत्या घडामोडींमुळे एरवी संथ व शांत वाटणारे मिरजेचे राजकारण आता पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
विशाल यांना ‘जशास तसे...’
या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आता खासदार विशाल पाटील यांना थेट प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत उतरली आहे. आधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला, त्यानंतर स्वतः सुरेश खाडे अधिक आक्रमक झाले आणि पाठोपाठ जयकुमार गोरे यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला. एकूणच, विशाल पाटील यांच्या प्रत्येक आरोपाला जशास तसे उत्तर देण्याची भाजपची नवी रणनीती आता स्पष्टपणे समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.