BJP VS Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Politics : भाजप आमदाराची काँग्रेस आमदाराला धमकी, म्हणाले, 'आमचे कार्यकर्तेसुद्धा...'

Abhijit Wanjarri Krishna Khopde : आमदार वंजारी यांच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या फलकाला काळे फासणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सज्जड दम दिला होता.

Roshan More

Nagpur BJP : विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्या फलकाला काळे फासल्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील निर्माण झालेला वाद आणखीच वाढला आहे. दोन्ही पक्षाच्यावतीने एकमेकांच्या विरोधात पोलिस तक्रार केली आहे. त्यानंतर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पुन्हा तोच फलक कार्यालयासमोर लावल्यास आमदार अभिजित वंजारी यांना याचे परिणाम भोगावे लागले, अशी थेट धमकीच दिली आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्तेसुद्धा जमिनीवरचेच आहेत. आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते असे सांगून विकास ठाकरे यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

अभिजित वंजारी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचे एक कार्यालय पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यांच्या कार्यालयासमोर अभिजित वंजारी, आमदार, पूर्व नागपूर असा फलक लावण्यात आला होता. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आहेत. ते भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा या फलकावर आक्षेप होता. तीन दिवसांपूर्वी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकाला काळे फासून आपला राग व्यक्त केला होता. दुसऱ्या दिवशी अभिजित वंजारी यांच्या फलकाला काळे फासल्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावरून काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला होता.

दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वंजारी यांच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या फलकाला काळे फासणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सज्जड दम दिला होता. तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून काहीही खपवून घेतले जाणार नाही. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर दिले असते असे ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले होते.

त्यानंतर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली.यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अभिजित वंजारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, फलकाला काळे फासल्याने आमदार वंजारी यांच्या स्वीय सहायकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हते. त्यांची नावे तपासून वगळण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

आमदार कृष्णा खोपडे यांनी अभिजित वंजारी यांनी पुन्हा तोच फलक लावला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. विधानपरिषदेचे आमदार असताना वंजारी यांनी जाणीवपूर्वक पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र असा उल्लेख आपल्या फलकावर केला आहे. हा प्रकार संविधान व जनप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. वंजारी हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. हे बघता त्यांनी हेतुपुरस्सरपणे दिशाभूल करणारा फलक लावला असल्याचे दिसते. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी आमदार वंजारी यांनी वकिलीची डिग्री तपासावी, तसेच कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे. जेणेकरून अशी हरकत यापुढे कुणीही करणार नाही असा सल्लाही खोपडे यांनी दिला.

भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी देऊ नये आम्हीसुद्धा जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आणि जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत असे थेट चॅलेंज खोपडे यांनी विकास ठाकरे यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT