MLA Dr. Babasaheb Deshmukh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Babasaheb Deshmukh : विकासासाठी योग्यवेळी योग्य निर्णय आवश्यक! आमदार बाबासाहेब देशमुखांच्या मनात काय?

Sangola politics : आगामी निवडणूकीबाबत अजून युती - आघाडीबाबत ठरवले नाही, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेईन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

सरकारनामा ब्यूरो

दत्तात्रय खंडागळे

Sangola Politics Alliance Decision : “राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो; परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णयच काळाला दिशादर्शक ठरतात”, असे मत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपसोबत झालेल्या युतीनंतर आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते ‘दैनिक सकाळ’शी बोलत होते.

आमदार डॉ. देशमुख म्हणाले, “राजकारणात टीका-टिप्पणी तर नेहमीच असते. आज टीका करणारे उद्या सोबतही असू शकतात. आम्ही टीकेकडे फार लक्ष देत नाही. तालुक्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते.” नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपसोबत केलेल्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले की,

“ही युती विकासाच्या दृष्टीने केली. आम्ही सर्वपक्षीय युतीचाही विचार केला होता; पण काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र तालुक्याचा विकास आणि लोकांचे प्रश्‍न सोडवणे हेच लक्ष्य असल्याने उपलब्ध परिस्थितीत योग्य वाटणारा निर्णय घेतला.”

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका : अद्याप निर्णय नाही

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत ते म्हणाले की, “युती किंवा आघाडीबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. निवडणुका लागल्या की कार्यकर्त्यांसोबत, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच अंतिम धोरण ठरवू. ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. आगामी निवडणूकीत ही आघाडी अशीच राहील, त्यामध्ये बदल होतील किंवा इतर पक्षही सामील होतील. राजकारणात काहीही घडू शकते त्यामुळे आजच त्याबाबत बोलणे उचित होणार नाही”

“मी टीका करण्याचे टाळतो, परंतु प्रसंगी उत्तर द्यावेच लागते…”

“माझा स्वभाव शांत. मी अनावश्यक टीका करीत नाही आणि इतरांवरील टीका करण्याचे टाळतो. पण राजकारणात काहीवेळा गैरसमज निर्माण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात, आरोप केले जातात. अशावेळी प्रसंगी उत्तर द्यावेच लागते. सकारात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची मनापासूनची इच्छा यामुळेच मला लोकांनी आमदार बनवले.”

“राजकारणात सकारात्मकता महत्त्वाची”

“कोणतीही निवडणूक असो, तिचा विचार फक्त निवडणुकीपुरता करावा. निवडणूक संपली की टक्कर, रणनीती, आरोप–प्रत्यारोप विसरून पुढे जायला हवे. तालुक्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या समस्यांसाठी मी जास्त वेळ देतो.” ते पुढे म्हणाले की, “राजकारणात कधीही काहीही घडू शकते. पण आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल आणि उद्दिष्ट विकासाचे असेल, तर कोणाची टीका फारशी महत्त्वाची राहत नाही. लोकांशी संवाद, त्यांचे प्रश्न आणि त्यांचे समाधान यालाच मी प्राधान्य देतो.असे देशमुखांनी सांगितले.

“राजकीय दृष्ट्या सांगोला शांततामयच” -

 पुढे बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले “स्वर्गीय आबासाहेबांच्या काळापासून सांगोल्याकडे राज्याने नेहमी शांततामय तालुक्याचा दृष्टिकोन ठेवून पाहिले आहे. आजही आम्ही त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवूनच मार्गक्रमण करतो. निवडणुकांमध्ये राजकीय टीका–टिप्पणी होत असतात, मतभेदही निर्माण होतात; पण तेवढ्यावरच सर्व काही थांबत नाही.

माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व नेतेमंडळी निवडणुकीत जरी परस्परांवर काही बोललो असू, तरी निवडणूक संपताच आम्ही पुन्हा एकत्र काम करतो, हेच सांगोल्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच राजकीय दृष्ट्या सांगोला हा शांतताप्रिय होता, आहे आणि पुढेही राहणार हेच खरे सत्य आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT