Maharashtra Politics : भाजपकडून विजयासाठी पराकाष्ठा, मित्रपक्षांनाही धडकी भरविण्यासाठीचे धोरण...

BJP Aggressive Campaign : महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत भाजपने आक्रमक प्रचार, तीव्र डावपेच आणि मित्रपक्षांवर दबाव टाकत वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. महायुतीतील मतभेद तीव्र होत असून आगामी निवडणुका अधिक संघर्षपूर्ण ठरणार आहेत.
BJP Maharashtra politics
BJP Maharashtra politicsSarkarnama
Published on
Updated on

BJP Local Elections : भाजपने नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत आक्रमक प्रचार करून महाराष्ट्रभर विजयासाठी पराकाष्ठा केली आहे. हे करताना भाजपने आपले मित्र पक्ष व विरोधी पक्षांचीही तमा बाळगली नाही. प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दिलेले शाब्दिक गुद्देच या निवडणुकीत चर्चिले गेले. भाजपने कांही ठिकाणी डावपेच खेळून निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न केले. विरोधक व सहकारी पक्षांवरही सुरूवातीलच धडकी भरविण्यासाठीचे हे धोरण होते.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने पुन्हा एकदा राज्यातील मोठा पक्ष होऊ या दृष्टीने प्रयत्न केले, यात किती यश मिळते, हे निकालानंतरच समजेल. मात्र, महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मित्रपक्षांमधील लढाई आणखी तीव्र होणार आहे. या लढाईला भाजप कसे सामोरे जातो हे पाहणे रंजक असेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावर लढायच्या याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने पूर्णपणे स्थानिक नेत्यांवर सोडून दिला. स्वतंत्र निवडणुका लढल्या तरी आपल्या मित्र पक्षांवर जपून टीका करा, मनभेद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असे भाजपच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना सांगितले होते.

राज्य सरकारमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावू बसणारे नेते या स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने वाद विकोपाला जावू नये याची काळजी निवडणुकीपूर्वी घेण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात निवडणूक होत असताना स्थानिक पदाधिकारी जाऊ द्या, भाजपच्या नेत्यांना व महायुतीतील नेत्यांना आपण मित्र पक्ष आहोत याचे भान राहिले नाही. प्रचार सभेत आपापसातील उणीदुणी काढताना कोणीही मागेपुढे पाहिले नाही.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 149 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 132 जागांवर भाजपने विजय मिळवला. विजयाचा हा स्‍ट्राईकरेट 88 टक्के इतका होता. लोकसभा निवडणुकीत 2019 च्या तुलनेत 14 जागा भाजपने गमावल्या होत्या, केवळ 9 खासदार 2024 ला निवडून आले. हा पराभव जिव्हारी लागल्याने भाजपने ही चूक 2024 च्या विधानसभेला सुधारली आणि पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारी घेतली. प्रभाग रचना, आरक्षण या वादावरून याचिका दाखल झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी गेल्या पाच सहा वर्षांपासून रखडल्या होत्या.

न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 29 महापालिका आणि 34 जिल्हा परिषदांची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या. या निवडणूक भाजपने हलक्यात न घेता जास्तीत जास्त ठिकाणी विजय कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले.

BJP Maharashtra politics
Mahapalika News : मोठी बातमी : 'या' महापालिकेत नव्याने आरक्षण सोडतीचे आदेश; नगरसेवक इच्छुकांचा जीव पुन्हा टांगणीला

आमदारांची फिल्डिंग

गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका कधी होणार विचार करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी या छोट्या गावांमधील, शहरांमधील रणधुमाळीत जीव ओतून प्रचार केला. आलेली संधी गमवायची नाही, काही करून निवडून जायचे यासाठी चंग बांधला होता. विधानसभेला मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आमदारांना त्यांचे तालुक्याचे शहर, जिल्ह्याचे शहर ताब्यात ठेवायचे असल्याने त्यांनीही जोर लावला आहे. या निवडणुकीत गावागावात पैशाचा धूर निघाला, मताला दोन हजार, तीन हजार इतका मोठा दर फुटला.

पुणे-मुंबईत राहणाऱ्या मतदारांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने मोठी फिल्डींग लावण्यात आली. साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून निवडणूक लढवली गेली. यात भाजपने जोरदार मुसंडी मारून मित्रपक्षांसह विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याची तयारी केली. भाजपचा हा चौखूर उधळलेला घोडा रोखायचा कसा याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या पुढे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

100 नगरसेवक बिनविरोध

भाजपने या निवडणुकीत प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांची फौज प्रचारात उतरवली होती. फडणवीस, चव्हाण आणि बावनकुळे या तिघांनी महाराष्ट्रभर सभा देऊन प्रत्येक भाग पिंजून काढला. तर अन्य नेत्यांनी जिल्हा, विभागात ठाण मांडून प्रचार केला. निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधून इनकमिंग झाले.

त्याचा फायदा भाजपला झाला. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीतील सर्व सदस्य व अध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याने अजित पवारांना झटका बसला. तेथे राजन पाटील यांच्या रूपाने कमळ फुलले आहे. मात्र नगराध्यक्षपदासाठीच्या राष्ट्रवादीच्या अर्ज बाद केलेल्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने येथील निवडमूक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा येथील नगरपरिषद भाजपने बिनविरोध जिंकली. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या. भाजपच्या यशस्वी डावपेचांमुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच राज्यभरात सुमारे १०० नगरसेवक आणि तीन अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.

मित्र पक्षांना दुय्यम वागणूक

विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुप्तवाद सुरु आहेत. शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानून घ्यावे लागले आहे. गेले वर्षभर ते काही बोलत नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची ही खदखद अखेर बाहेर पडलीच. भाजपने सुरू केलेल्या फोडाफोडीवरून शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. पण शहांनी तुमचे लोक सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच आहे असे सांगून शिंदेंच्या दबावतंत्राला सुरुंग लावला.

शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदे सेनेला लक्ष्य करून अनेकांचे प्रवेश करून घेतले आहेत. भर निवडणुकीत जामनेरमध्ये शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या दोघांना भाजपमध्ये प्रवेश दिला, त्यांना अन्य प्रभागातून उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. भाजपच्या या वर्तनामुळे शिंदे यांनी अहंकाराची लंका जळून जाईल, असे वक्त करून फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी आम्ही तर श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही लंकेत राहतच नाही, असे प्रत्युत्तर देऊन शिंदे यांच्या टीकेतील हवा काढून घेतली.

BJP Maharashtra politics
Mahayuti Politics : 'महायुती न झाल्यास मुंबईचा महापौर आमचाच...'; शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात ‘तुम्ही आम्हाला मतदान दिले तर आम्ही निधी देऊ. राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे,’ असे सांगितले होते. या वाक्यावरून बराच गदारोळ झाला होता. भाजपने यामध्ये अजित पवार हे अर्थमंत्री असले तरी निधी वाटपाचे सर्व अधिकारी मुख्यमंत्र्यांना आहेत. मुख्यमंत्री सर्वांना समान निधी देतील असे भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यावरून दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला होता.

एकनाथ शिंदे यांनी या प्रचारात लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला असे ठणकावून सांगत याचे श्रेय घेतले. पण हा मुद्दा देखील भाजपने खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भाजपने मित्रपक्षांचे खच्चीकरण सुरू केल्याने त्यांच्यावर विरोधीपक्षाकडूनही टीका केली गेली. पण त्याचा भाजप नेत्यांवर काही फरक पडलेला नाही.

BJP Maharashtra politics
Eknath Shinde vs Ravindra Chavan dispute : शिंदे अन् चव्हाण लवकरच एकत्र जेवतील; फडणवीसांनी आखली 'डिनर डिप्लोमेसी'

भाजपला विजयाची प्रतीक्षा

नगरपालिका, नगर परिषदेत ठराविक भाग सोडला तर वर्षानुवर्ष येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. या दोन्ही पक्षांना उतरती कळा लागण्यास सुरुवात झाल्यापासून आणि २०१४ नंतर भाजप मजबूत झाल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यावेळी नगर परिषद, पालिका नगराध्यक्षपदासाठी भाजपने राज्यभरात 242ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे केले होते. तर 46 ठिकाणी महायुतीचे उमेदवार होते.

भाजपने 200 पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी चंग बांधलेला आहे. पण तेवढे यश मिळणार नसले तरी सुमारे 150 ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून येतील, असा अंदाज आहे. तर सर्व ठिकाणी मिळून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.

महापालिका आणि झेडपी लक्ष्य

नगरपालिका, नगरपरिषद ताब्यात घेणे हे भाजपचे आताचे लक्ष्य आहे. आता भाजपचे पुढचे लक्ष्य हे मुंबई महापालिका हे आहेच, पण उर्वरित 28 महापालिकांवर भाजपला एकछत्री अंमल हवा आहे. शहरांसह ग्रामीण भागाचा कणा असणाऱ्या जिल्हा परिषदेतही वर्चस्व वाढविण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे. 75 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका ताब्यात यावी भाजप यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे.

2017 ला अवघे सहा नगरसेवक कमी पडेल, तेव्हा उद्धव ठाकरे आणि भाजपचे संबंध चांगले होते. त्यामुळे भाजपने कुरघोडी केलेली नव्हती. मात्र, आता राज्यातील वातावरण पूर्णपणे वेगळे आहे. काही काही करून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायचीच हा चंग बांधला आहे.

त्याचसोबत ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबवली, पनवेल अशा मुंबई उपनगरांमधील महापालिका भाजप ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत संबंध ताणले गेले. ठाण्यात भाजपचा वाढता प्रभाव बघून शिंदे चिडलेले आहेत. अशा स्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांचे संबंध चांगले राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.

त्याच बरोबर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर अशा प्रमुख शहरातील महापालिका एकहाती जिंकण्यासाठी भाजपने यंत्रणा लावलेली आहे. बहुतांश ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवून पुन्हा मित्र पक्षांना प्रचारात डिवचण्याचे काम भाजपकडून होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा खरा सामना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला शिंदेंसोबत आणि जिल्हा परिषदेला पवारांसोबत भाजपचा लढा असणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा (NCP) जिल्हाध्यक्ष हा भाजपच्या मदतीशिवाय होणार नाही यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. किमान २४ सदस्य पुणे जिल्ह्यातून निवडून आले पाहिजेत असे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रमाणे सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भात अजूनही काही ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसची ताकद आहे. अशा वेळी भाजपला (BJP) सत्ता आणायची असल्यास महायुतीही करावी लागणार आहे. पण नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या शक्यतेमुळे हा आत्मविश्‍वास आगामी निवडणुकीसाठी कामाला येणार आहे. आता आयोगाने काही नगरपरिषदा व पालिकांच्या निवडणुका कांही आक्षेपांमुळे पुढे ढकलल्या आहेत. त्या 21 डिसेंबरला होतील. तोपर्यंत सर्वांना निवडणूक निकालाचीही प्रतीक्षा लागलेली असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com