राजेंद्र त्रिमुखे
Nagar News : शिर्डी येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम भव्य दिव्य आणि हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 600 बसेस मधून नागरिकांना कार्यक्रमस्थळी आणण्यात येत आहे.
मात्र, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना याची कल्पना नसल्याने ते बसची वाट पाहताना ताटकळत दिसून येत आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार तनपुरे यांनी ताटकळत बसलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्याशी चर्चा केली आणि आज तुमची होणारी अडचण का याचीही माहिती त्यांना दिली. त्याचबरोबर नागरिकांना बळजबरीने भरभरून बसमधून पाठवण्यात येत आहेत. हे पाहून, "शासन आपल्या दारी" की "जनता शासनाच्या दारी" असा प्रश्न पडल्याचे आमदार तनपुरे यांनी म्हटलं आहे. कार्यक्रमास उपस्थित न राहिल्यास लाभ मिळणार नसल्याची भीती दाखवून लाभार्थ्यांना नेण्यात येत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
तनपुरे यांनी आपल्या वाहनातून शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसवून शाळेमध्ये पोहोचवले. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते यांना नेण्यासाठी एसटी बसची सोय केल्याचे पाहून; पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनातून कार्यक्रमाला जावं. यासाठी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना वेठीस धरले गेले यावर त्यांनी सरकारवर टीका केली. ज्याप्रमाणे गुहाटीला स्वतःच्या वाहनातून गेला तसं कार्यकर्त्यांची सोय का केली नाही,असा खोचक सवाल आमदार तनपुरे यांनी सरकारला विचारला आहे.