Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : दुष्काळाच्या मुद्द्यावरून आमदार प्रणिती शिंदेंची लोकसभेसाठी साखर पेरणी...

Anand Surwase

Nagpur News : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात आपले दौरे सुरू केले असून या मतदारसंघातील प्रश्नावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवत साखर पेरणीला सुरुवात केली आहे. मंगळवारी आमदार शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनातील अल्पकालीन चर्चेत सहभाग घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळावर प्रश्न उपस्थित केला. (MLA Praniti Shinde started preparations for Solapur Lok Sabha)

यंदाच्या वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे सरकारने राज्यभरात एकूण 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, सांगोला, माळशिरस आणि करमाळा या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, जिल्ह्यातील सोलापूर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या तालुक्यांचाही दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात येत होती. यावर सरकारकडून 9 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील 40 महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील महसुली मंडलांचा समावेश आहे.

दुष्काळसदृश्य नको, दुष्काळी यादीत समावेश करा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी दुष्काळाच्या मुद्यावर सरकारला एक सूचना केली आहे. सरकारने सोलापूर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यातील 40 महसुली मंडलांचा समावेश दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या यादीत समावेश केला आहे. मात्र, या तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे या आगामी लोकसभेची निवडणूक सोलापूर मतदारसंघातून लढविण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सोलापूर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यांचा समावेश होत आहे. एरव्ही स्वत:च्या शहर मध्य मतदारसंघातील किंवा शहरातील प्रश्नावर विधानसभेत प्रश्न विचारणाऱ्या शिंदे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नावर आवाज उठवल्याने त्यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट होत आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे या कामाला लागल्याची चर्चा आता होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT