jain minority corporation News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lalit Gandhi: जैन महामंडळ अध्यक्ष नियुक्तीचा वाद चिघळणार? फडणवीसांसमोरच आमदार यड्रावकर म्हणाले....

Rajendra Patil Ydravkar opposed lalit gandhi president of jain minority corporation : महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मान अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना देण्यात आला.

Rahul Gadkar

Kolhapur News: गेल्या काही वर्षांपासून जैन समाजासाठी केलेल्या कार्याचे दखल घेत महायुती सरकारने स्थापन केलेल्या जैन महामंडळाच्या अध्यक्षपदावर कोल्हापूरच्या व्यक्तीला विराजमान करण्यात आले आहे. पहिल्यांदाच महामंडळाच्या अध्यक्षपदावर कोल्हापूरच्या ललित गांधी यांना संधी देण्यात आली.

या निर्णयाचे जैन समाजाकडून स्वागत होत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात जैन महामंडळाच्या अध्यक्षपदावरून निवड झालेल्या व्यक्तीलाच अप्रत्यक्षपणे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोध दर्शवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच समाजातर्फे खंत व्यक्त करत आपली भावना व्यक्त केली.

महायुती सरकारने मागील मंत्रिमंडळात पहिल्यांदाच जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मान अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना देण्यात आला. महायुती सरकारच्या या निर्णयानंतर संपूर्ण जैन समाजाकडून स्वागत करण्यात आले. जैन महामंडळाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जैन समाजाचा भव्य कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी येथे झाला. पंचकल्याण संस्थांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जैन महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे आभार मानले. मात्र भाषणा दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडीवरून त्यांनी समाजातर्फे खंत व्यक्त केली. जैन समाजासाठी महायुती सरकारने महामंडळ दिले. पण राज्यात आज 85% दिगंबर जैन समाज आहे. त्यामुळे दिगंबर जैन समाजाला संधी आणि प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, ही समाजाची खंत आहे. येणाऱ्या काळात त्याची पुनर्रचना केली जावी, अशी मागणी करत अप्रत्यक्षपणे ललित गांधी यांच्या निवडीलाच विरोध दर्शवला आहे.

निवडीबाबत कोणाचाही विरोध नाही: ललित जैन

जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याशी 'सरकारनामा'शी संपर्क साधला असता ते म्हणाले की माझ्या निवडीबाबत कोणाचाही विरोध नाही. आमदार यड्रावकर यांनी आपल्या समाजातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी भूमिका मांडली. त्यांनी आपल्या मतदारसंघातील आकडेवारी सांगितली. पण राज्यातील परिस्थिती पाहता 60 लाख जैन बांधव आहेत. त्यातील श्वेतांबर जैन समाजाची संख्या अधिक आहे.

हे महामंडळ स्थापन होण्यासाठी सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू होता. अनेक आमदारांच्या गाठीभेटी घेऊन मी या महामंडळासाठी प्रयत्न केले आहेत. पण जैन समाजात कोणतीही दरी नाही. समाज म्हणून आम्ही एकत्र आहोत. समाजातील इतरांची देखील संचालक पदावर नियुक्ती होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दिगंबर जैन समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे ललित गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT