Solapur, 28 November : ‘मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. आमदार रोहित पवार ८ नोव्हेंबरला माझ्या पानमंगरूळ येथील घरी आले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबरला मी व भाऊ सचिन कत्ते दोघे गावातून अक्कलकोटमध्ये गेलो. दुपारी साडेतीनच्या सुमारास मामाच्या दुकानावरून तेथील वृंदावन हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो.
यावेळी मीलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, विकास बुळ्ळा यांच्यासह ११ जण तेथे आले. त्यांनी राजकीय वैमनस्यातून मारहाण करून जखमी केले’ अशी फिर्याद ओमप्रसाद प्रकाश कत्ते यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसांत दिली. यावरून अक्कलकोटचे नगराध्यक्ष कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य बुळ्ळा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
राजकीय वैमनस्यातून अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मीलन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य विकास बुळ्ळा यांच्यासह रुद्रय्या स्वामी, अमर सिरसाट, लक्ष्मण इंडे, बाबू करपे, सिद्धू माळी, विनायक डिग्गे, सुदर्शन लवटे, बबलू भागनवरे, सागर कल्याणशेट्टी यांनी आपल्याला डोक्यात, सर्वांगावर मारहाण केली.
या भांडणात माझ्या गळ्यातील दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची चेन गहाळ झाली आहे. ते ११ जण मारहाण करत असताना भाऊ सचिन व ओळखीचे मल्लिकार्जुन पाटील, संजू पाटील, काका पाटील, गजानन जक्कीकोरे, शिवराज म्हेत्रे यांनी मला त्या लोकांच्या तावडीतून सोडवले, असेही फिर्यादीत नमूद आहे.
यावरून दुखापत करणे, शांतता भंग करणाऱ्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे, बेकायदा जमाव जमवणे, अशा विविध पाच कलमांतर्गत ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना नोटिसा बजावून त्यांच्याकडे तपास केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कमलाकर सोनकांबळे यांचीही फिर्याद
मी जिल्हा बॅंकेचा मतदार आहे. आमच्याच जिवावर मोठा झाला आणि आता जास्त शहाणपणा करतो का, असे म्हणून ओमप्रसाद कत्ते, सचिन कत्ते यांच्यासह पाच ते सहा जणांनी दमदाटी केली. शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कमलाकर सोनकांबळे यांनी दिली आहे. यावरूनही आठ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक अविनाश पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.