Solapur Dcc Bank Result : मोहिते पाटलांनी टाकलेला डाव गोरेंनी मतदानाच्या आदल्या दिवशी उधळला; राऊत, कल्याणशेट्टी, परिचारकांची खंबीर साथ!

Jaykumar Gore Kingmaker : सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपने प्रथमच सत्ता मिळवली. जयकुमार गोरे यांनी स्थानिक नेत्यांना एकत्र आणत रणनीती आखली. मोहिते-पाटील यांचा क्रॉस व्होटिंगचा डाव हाणून पाडल्याचे विश्लेषणात म्हटले आहे.
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 28 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आजपर्यंत तब्बल १०८ वर्षे सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रथमच बॅंकेवर सत्ता मिळविली आहे. गोरे यांच्या नेतृत्वाने स्थानिक बड्या नेत्यांना एकत्र आणत बांधून ठेवण्याची किमया साधल्याने भाजपला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली आहे. मोहिते पाटील यांनी टाकलेला ‘क्रॉस व्होटिंग’चा डाव गोरे यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी उलटवून लावला. साताऱ्यात बॅंकेची सूत्रे हाती घेण्याची स्ट्रॅटेजी हुकल्यानंतर सोलापुरात सावध पावले टाकत गोरे किंगमेकर ठरले आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत, चेअरमन निवडीत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून आलेल्या अनुभवावरून पालकमंत्री गोरे सोलापूरसाठी सावध झाल्याचे दिसले. कलम ८८ आणि ११० अनुसार झालेल्या कारवाईमुळे माजी संचालकांना निवडणूक लढवता येत नव्हती. या कारवाईला स्थगिती देण्याच्या विषयापासून मतदानापर्यंत माजी संचालकांना पद्धतशीरपणे हाताळण्यात पालकमंत्री गोरे यशस्वी ठरले आहेत.

सोसायटी मतदारसंघ बिनविरोध झालेल्या तालुक्यांमध्ये जाऊन मोहिते पाटील यांनी मतांची जुळवाजुळव सुरू केली होती. मतमोजणी तालुकानिहाय होणार नाही, असे सांगत ‘क्रॉस व्होटिंग’चा डाव टाकला होता. मात्र, तालुकानिहाय मतमोजणी करण्याचा निर्णय मतदानाच्या आदल्या दिवशी करून पालकमंत्री गोरे यांनी हा डाव उलटावून लावल्याचेही दिसले.

गोरे यांच्या त्या खेळीला अक्कलकोटमधून आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शीतून आमदार राजेंद्र राऊत, मोहोळमधून माजी आमदार राजन पाटील, पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि करमाळ्यातून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी खंबीर साथ मिळाल्याचे निकालातून दिसले.

समविचारींना सोबत ठेवत १९ पैकी १८ जागा जिंकल्या. जिंकलेल्या १८ जागांमध्ये पालकमंत्री गोरे यांनी मर्जीतील संचालकांचेही बहुमतही गाठले आहे. महापालिका, जिल्हा परिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही पालकमंत्री गोरे हे पॉवरफुल्ल ठरले आहेत.

Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Congress Vs NCP SP : काँग्रेसकडून पवारांच्या राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप; डिलिमिटेशनच्या समर्थनाचा घेतला खरपूस समाचार

जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये भाजपचे कॅप्टन म्हणून पालकमंत्री गोरे यांची इनिंग सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीपासून सुरू झाली. तेव्हापासून सुरू झालेला एकहाती विजयाचा पॅटर्न नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषद निवडणूक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही कायम राहिला आहे. सोलापुरातील पालकमंत्र्यांची पक्षीय कामगिरी म्हणून गोरे यांच्या कामगिरीचा संदर्भ आगामी काळातही नक्कीच दिला जाईल.

मोहिते-पाटलांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार

माढा लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार राम सातपुते यांच्या विरोधात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जुना संघर्ष आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपासून सातारा आणि सोलापूर डीसीसीच्या निवडणुकीपर्यंत हा संघर्ष कायम राहिला आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Solapur Dcc Bank Result : नेत्यांचा भरणा तरीही मंगळवेढा, दक्षिण सोलापूरमध्ये भाजपला दे धक्का; उत्तर सोलापूर, माढ्यात ‘क्रॉस व्होटिंग’चा धडाका

अदृश्‍य शक्तीची दिशा

या संघर्षात माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद व विधान परिषद निवडणुकीत उघडपणे समोर आले नव्हते. डीसीसीच्या माध्यमातून ते पालकमंत्री व भाजपच्या विरोधात समोर आले आहे. येत्या काळातील या संघर्षासाठी ते हाती कोणता झेंडा घेतात?, यावर जिल्ह्यातील संघर्ष व शिट्टीला मिळालेल्या अदृश्‍य शक्तीची दिशा अवलंबून दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.