Akkalkot, 03 May : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवरून तालुक्यात पुन्हा राजकारण तापले आहे. माजी आमदार तथा सभापती सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर आपल्याच गटाचा संचालक बसावा, यासाठी सत्ताधारी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पाटील गटात शह-कटशह सुरू आहे. सभापती निवडीची नोटीस वेळेत मिळाली नाही, तसेच सभेचा अजेंडा १५ दिवस अगोदर देणे आवश्यक असूनही न दिल्याचे सांगून संजीव सिद्रामप्पा पाटील यांनी कोल्हापूर खंडपीठातून निवडणुकीला स्थगिती मिळविली आहे. सचिवाला ७ मेपर्यंत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे, त्यामुळे आमदार कल्याणशेट्टींच्या स्वप्नपूर्तीस तूर्तास ब्रेक लागला आहे.
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक शनिवारी (ता. ०२ मे) होणार होती. ती मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने स्थगित केली आहे. त्याबाबत बाजार समितीचे सचिव एस. व्ही. कुंभार यांनी पत्र काढून कळविले आहे.
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक माजी आमदार (स्व.) सिद्रामप्पा पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी युती करून लढवली होती. या दोघांच्या पॅनेलला बहुमत मिळून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे सभापती झाले होते. मात्र, माजी आमदार पाटील यांचे नुकतेच निधन झाले, त्यामुळे उपसभापती आप्पासाहेब पाटील यांना सह्याचे अधिकार देण्यात आले होते.
अक्कलकोट बाजार समिती ही एकूण 18 संचालकांची आहे. माजी आमदार सिद्धाराम पाटील यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. सध्या १७ संचालक असून सभापती निवडीसाठी नऊ संचालकांचे बहुमत आवश्यक आहे.
वास्तविक, कल्याणशेट्टी आणि पाटील गटाची बाजार समितीवर एकत्रित सत्ता आहे. मात्र, मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान दोन्ही गटांत उमेदवारीवरून वाद झाला आणि दोन्ही गट वेगळे झाले आहेत, त्यामुळे बाजार समितीत सत्तास्पर्धा रंगली आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाकडे नऊ संचालक असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर कल्याणशेट्टी गटाचे नऊ संचालक एकत्रितपणे बाहेरगावी गेले होते, असेही सांगितले जात आहे. त्याचवेळी प्रशासकीय पातळीवरून दोन मे रोजी सभापतिपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
सभेची नोटीस वेळेत दिली नाही. सभेचा अजेंडा १५ दिवस अगोदर देणे आवश्यकत असताना तो दिला गेला नाही, त्यामुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी संचालक संजीव पाटील यांनी खंडपीठात केली. न्यायालयाने दोन मे रोजीच्या निवडणुकीला स्थगिती देत सात मेपर्यंत बाजार समितीच्या सचिवांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
बाजार समितीचे सचिव एस. व्ही. कुंभार यांनी १ मे रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सभापती निवडीबाबत रीट याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २ मे रोजी होणार निवड स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सभापती निवडीची प्रक्रिया राबविण्यात येईल.
अक्कलकोट बाजार समितीच्या सभापतिपदासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाकडून विद्यमान उपसभापती आप्पासाहेब पाटील व संचालक बाबुशा करपे यांची, तर पाटील गटाकडून स्वतः संजीव पाटील आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. उपसभापती पाटील यांची सभापतिपदी निवड झाल्यास आणखी एका संचालकास उपसभापतिपदाची संधी मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.