

Nashik Kumbmela : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहर व लगतच्या ग्रामीण भागातून सुमारे 66 किलोमीटरचा बाह्य परिक्रमा मार्ग (रिंग रोड) विकसित केला जात आहे. त्यासाठी भूसंपादन केले जात असून, जमिनींची मोजणी सुरू आहे.
भूसंपादनासाठी मोजणीदरम्यान अधिकारी व पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा गंभीर आरोप नाशिक जिल्ह्यातील मातोरी व मुंगसरे गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, महायुती सकारवर विरोधकाकंडून टीका होत आहे. अशात एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच आता सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे म्हणत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. बळाचा वापर करुन शेतकऱ्यावर लाठीमार करणे हा अन्याय आहे. शेतकऱ्यांवर अशापद्दतीने दमदाटी करणं हे चुकीचं आहे. जिल्ह्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना उघडं पाडून कुंभमेळा करणार का? असा सवाल उपस्थितीत करत आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कुंभमेळ्याची कामं व्हायला हवी अशी अपेक्षा आमदार खोसकर यांनी व्यक्त केली. सरकारला रिंगरोड करायचा होता तर पाच -दहा वर्ष आधीच शेतकऱ्यांना त्याची कल्पना द्यायला हवी होती. असं केलं असतं तर शेतकऱ्यांनी त्यांची राहती घरं तिथे बांधली नसती, ती जागा सोडून दिली असती. पण अचानक कारवाई करत शासन शेतकऱ्यांना उद्धवस्त करत आहे. आम्ही सत्तेमध्ये आलो तर शेतकरी मारुन टाकायचे का? असा सवाल हिरामण खोसकर यांनी केला आहे.
त्या आजीला इतकं मारलेलं आहे. बघितलं तर डोळ्यात पाणी येंत इतकं मारलं आहे. अशी मारझोड असते का? प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे, त्यांची मानसिकता तयार करायला हवी. शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या. प्रांताधिकाऱ्याला असे अधिकार नाही. आधी शेतकऱ्यांची मीटिंग घ्यायला पाहीजे होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात. तुम्ही थेट हुकुमशाही करता व पोलिस पाठवता हे चुकीचं आहे अशी भूमिका हिरामण खोसकर यांनी मांडली.
मी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना विनंती करणार आहे. सगळीकडेच दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये अशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्याला रस्त्यावर उघडं पाडून कुंभमेळा करायचं काम चालू आहे", अशी टीका करत आमदार खोसकर यांनी नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.