Vinay kore-Prakash Awade
Vinay kore-Prakash Awade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे ठरवणार कोल्हापूरचा पालकमंत्री!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : महाविकास आघाडीसाठी विशेषतः पालकमंत्री सतेज पाटील यांना एकतर्फी वाटणारी कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ-सतेज पाटलांना साथ देणारे पन्हाळा-शाहूवाडीचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पक्षाला साथ देण्याची घोषणा केली आहे. भाजपनेही या जागेसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा शौमिका महाडिक यांची उमेदवारी पक्की केली आहे, त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक चांगलीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. (MLA Vinay Kore and Prakash Awade support BJP for Legislative Council elections)

दरम्यान, सतेज पाटील यांचे मंत्रीपद आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ठेवायचे की घालवायचे, एवढी ताकद आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे हे दोन्ही गट जिल्ह्याच्या राजकारणात राखून आहेत.

कोल्हापूर विधान परिषदेचे विद्यमान आमदार आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून पक्की आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून शौमिका महाडिक किंवा राहुल आवाडे यांच्या दोघांपैकी कोण लढणार हे आज सायंकाळपर्यंत कळणार आहे. पण, सध्या तरी तगडा उमेदवार म्हणून शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आहे. त्यांचे नाव जाहीर झाल्यास एक तुल्यबळ लढत कोल्हापुरात पुन्हा पहायला मिळणार आहे.

कोल्हापुरात महाविकास आघाडी, तर राज्यस्तरावर आपला पाठिंबा हा भाजपला राहणार आहे, अशी घोषणा विनय कोरे यांनी गोकुळ निवडणुकीच्यावेळी केली होती. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत तशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीवेळी उपस्थित असलेले आमदार आवाडे आणि कोरे यांनी भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, अशी ग्वाही दिली आहे.

विनय कोरे हे पन्हाळा-शाहुवाडी मतदारसंघाचे आमदार असले तरी हातकणंगले आणि जयसिंगपूरमध्ये त्यांना मानणारा मतदार आहे. याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील पन्हाळा, मलकापूर नगरपालिकेसह जिल्हा परिषदेतही कोरे यांचे मतदार आहेत. करवीर, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील काही मते ते आपल्या शब्दावर फिरवू शकतात. मागील निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा दिला होता आणि तोच पाटलांच्या विजयाचा की फॅक्टर ठरला होता. इलचकरंजीतील मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या आवाडे कुटुंबीयांनीही आता भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांचा इचलकरंजीसह हुपरी, जयसिंगपूर नगरपालिकेत गट आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांच्या गटाचे दोन सदस्य आहे. शिवाय हातकणंगले व पेठ वडगावमधील मतेही ते भाजप उमेदवाराकडे वळवू शकतात.

गोकुळनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमदार कोरे आपल्याबरोबर राहतील, अशी अपेक्षा सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ बाळगून हेाते. मात्र, त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

दुसरीकडे, गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे महाडिक गटासोबत होते. आता मात्र त्यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. पी. एन. पाटील हे आमच्या पक्षाचे नेते आहे, त्यांच्यासोबत आम्ही यापुढे काम करणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले होते. तर कोरे हे सरूडकरांचे पारंपारिक विरोधक असल्याने कोरे भाजपच्या गोटात जाताच ते पाटील-मुश्रीफ गटाकडे आले आहेत. महाविकास आघाडीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीला या दोघांनीही हजेरी लावून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT