Solapur, 22 September : मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार राजन पाटील आणि पक्षाचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. त्या वादातून हे दोन्ही नेते एकमेकांना आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली आहे. त्याबद्दल आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे उमेश पाटील यांच्याबाबत तक्रार केली.
मोहोळ शहरात (Mohol) आज सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात यानिमित्ताने सभा सुरू आहे. त्या सभेत बोलताना आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी मोहोळ मतदारसंघात आणलेल्या विकास निधीबद्दल माहिती दिली. त्यानंतर भाषणाच्या शेवटी आमदार यशवंत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याबाबत तक्रार केली.
आमदार यशवंत माने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार म्हणून अजितदादा (Ajit Pawar) आणि सुनील तटकरे साहेब तुम्हाला विनंती करतो. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून येतील. नागनाथाच्या पावन भूमीत अजितदादा तुम्हाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं आहे आणि जनता नक्कीच आपल्याला आशीर्वाद देईल.
सुनील तटकरेसाहेब, तुम्ही शिस्तप्रिय आहात. बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तुम्ही दोघेही शिस्तप्रिय नेते आहात. पण, मोहोळ मतदारसंघात मी सांगू नये; पण सांगतो. आपल्या नावाचा वापर करून पक्षात बेशिस्त वर्तन करणाऱ्या संख्या वाढली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे, असे आमदार यशवंत माने यांनी नाव न घेता उमेश पाटील यांची तक्रार सांगितली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आपण दिलेला उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहे; म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून माजी आमदार राजन पाटील, त्यांची दोन्ही मुले आणि माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत.
आमच्याविषयी खालच्या पातळीची भाषा वापरली जाते. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आणि आपण त्यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती करतो, असे सांगून आमदार माने यांनी उमेश पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नाव न घेता केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.