Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Yashwant Mane : तुतारी हाती घेणार का? आमदार यशवंत माने म्हणाले, ‘मला शरद पवार गटाकडून ऑफर...’

Vijaykumar Dudhale

Solapur, 31 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास केला होता. त्यामुळे माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती. त्याच अनुषंगाने फुलचिंचोली येथे बोलताना आमदार माने यांनी ‘मला शरद पवार गटाकडून कोणतीही ऑफर येणार नाही,’ असे ठामपणे सांगून टाकले.

मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी भिगवण ते बारामती असा एकाच गाडीतून प्रवास केला होता. त्याचबरोबर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयातून फोन आल्याची चर्चा रंगली होती, त्यामुळे यशवंत माने आणि राजन पाटील यांच्याबाबत चर्चांना उधाण आले होते. त्यावर आमदार माने यांनी आज स्पष्टीकरण दिले.

आमदार यशवंत माने म्हणाले, पवार घराण्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी इंदापूरचा नागरिक असून सुप्रिया सुळे त्या भागाच्या खासदार आहेत, त्यामुळे सुप्रिया सुळे या सांत्वन भेटीसाठी इंदापूर (Indapur) तालुक्यात आल्या होत्या, त्यावेळी आम्ही एकत्र होतो. भेटीनंतर आम्ही बाहेर पडलो. त्या वेळी मीही बारामतीला जाणार होतो आणि सुप्रिया सुळे याही बारामतीला जाणार होत्या, त्यामुळे एकत्र प्रवास करण्याचे ठरले.

त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून मी भिगवण ते बारामती असा प्रवास केला. बारामतीपर्यंत आम्ही चर्चा करत गेलो, त्यात विशेष काही असे नव्हते. भिगवण ते बारामती या प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. महाविकास आघाडी किंवा महायुती या संदर्भातली कुठलीही चर्चा त्यावेळी झालेली नाही, असेही माने यांनी स्पष्ट केले.

यशवंत माने म्हणाले, मोहोळ विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 17 गावांत कुठल्याही पक्षाचा प्रश्न येत नाही. या भागात व्यक्ती बघून मतदान केले जाते, या मोहोळ मतदार संघातील या 17 गावांत पक्षाचा विषय येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT