Sangli-Satara MLC election may witness a triangular political battle as both NCP factions consider a joint strategy against BJP. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी 'राष्ट्रवादी'चा पुन्हा ZP पॅटर्न? संख्याबळाने वाढवली भाजपची धडधड

सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

Rahul Gadkar

MLC Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा पुन्हा जमिनीवर बसतोय तोपर्यंत विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या जागा महायुतीकडून एकत्र लढवणार असल्याचा संदेश दिला जात आहे. मात्र कोकण, नाशिक, संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली, सातारा-सांगली यांसारख्या काही मतदारसंघावरून महायुतीमध्ये वाद सुरु आहेत. यामुळे या मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाल्यास भाजपची धडधड वाढू शकते. कारण जिल्हा परिषदेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक एकत्र लढल्यास भाजपपुढे आव्हान उभे राहू शकते. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पक्षीय पातळीवर भाजपकडे बलाबल अधिक असले तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपचा पराभव शक्य आहे. तसे अधिकचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे सातारा सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

राज्य पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे धोरण ठरले आहे. मात्र सांगली आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी पाहिली तर दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा दबाव जुगारून जिल्हा परिषदांची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढली होती. आजही दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी एकत्र आहेत. काही नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या. हाच संदर्भ घेऊन या विधानपरिषद निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र करण्याचा अंदाज काही नेत्यांकडून सुरू आहे.

सांगली-साताऱ्यातील पक्षीय बलाबल

भाजपकडे दोन्ही जिल्ह्यांमध्ये 314 इतके पक्षीय बलाबल आहे. त्यामध्ये सांगलीत 115 आणि साताऱ्यात 199 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन्ही जिल्ह्यात 205 इतके संख्याबळ आहे. यात सांगलीत 74 आणि साताऱ्यामध्ये 131 असे मतदार आहेत. तर शिवसेनेकडे 111 यात सांगलीत 62 तर साताऱ्यामध्ये 49 असे मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडे सांगलीमध्ये 96 तर साताऱ्यामध्ये 23 असे 119 चे संख्याबळ आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसचे सांगलीमध्ये 67 तर साताऱ्यामध्ये 6 असे मिळून 73 संख्याबळ आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा केवळ एक मतदार आहे. साताऱ्यात अपक्ष 30 आहेत.

जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काय होईल?

जर उमेदवारीवरून चर्चा फिस्कटली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपचे टेन्शन वाढू शकते. एकत्र आल्यास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून 324 संख्याबळ होऊ शकते. शिवाय साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत झालेल्या राजकारणची सल शिवसेना भरून काढू शकते.

कोण असणार उमेदवार?

महायुतीमध्ये उमेदवारीवर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा असला तरी संख्याबळाचा विचार करता भाजपला उमेदवारी मिळवण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीची भूमिका भाजपच्या उमेदवारावर अवलंबून आहे. भाजपकडून शेखर गोरे, धैर्यशील कदम, पृथ्वीराज देशमुख आणि सम्राट महाडिक यांच्य नावाची चर्चा आहे.

महाविकास आघाडीमध्ये अद्याप उमेदवारीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पण जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. यात सातारा जिल्ह्यातून माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व सांगलीतून जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. संख्याबळ नसल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्याबाबत अद्यापही कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT