Manoj Jarange Patil-Narendra Modi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jarange Patil Warning : मोदीसाहेब, महाराष्ट्रातील तुमच्या कर्त्या नेत्याला थोडी समज द्या; जरांगे पाटलांचा इशारा कोणाकडे

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 April : मोदीसाहेब, महाराष्ट्रातील तुमच्या भाजपच्या कर्त्या नेत्याला थोडी समज दिली तर बरं होईल. नाही दिली तर फजिती होणारच आहे. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. हे असंच सुरू राहिलं, तर विधानसभेला मी मैदानात आहेच. मराठ्यांचा द्वेष सोडून द्या, नाही तर आगामी काळात आम्ही मैदानात राहून त्यांचा पुरता सुफडासाफ केला जाईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सोलापूरमध्ये (Solapur) माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले, मराठ्यांचा द्वेष असाच सुरू राहिला तर विधानसभेला (Assembly Election) मी मैदानात आहेच. त्यांचा सुफडासाफच करणार आहे. त्यांना सोडतच नाही. आचारसंहिता उठल्यानंतर सगेसोयऱ्यांचा निर्णय घेतला नाही तर आम्ही विधानसभेला 288 लोक उतरवणार आहोत. त्यात मुस्लिम, धनगर, मराठा, बारा बलुतेदार, दलित, लिंगायत असणार आहेत. आम्ही एवढे सगळे एकत्र आलो, तर त्यांचा उलटा सुलटा कार्यक्रम झालाच म्हणून समजा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमच्या भूमिकेमुळे राजकीय पक्षांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हटलं, ना महाविकास आघाडीला. आमचा अजेंडा स्पष्ट आहे की, एवढ्या वेळेस पाडा. उमेदवार उभा करण्यापेक्षा पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे. जो सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूनं असेल. कुणबी आणि मराठा एकच आहेत, या बाजूने असेल, त्यांना मराठा समाजाने सहकार्य करावं. मुलांच्या भविष्यासाठी आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने ताकदीने काम करायचे आहे. मराठा समाजाला आमचा इशारा कळालेला आहे आणि तो बरोबर करतो, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

जरांगे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात एवढ्या सभा घेण्याची कधी गरज पडली नाही. त्यांच्या पक्षाचे चिन्ह सोडून दुसऱ्यांच्या चिन्हाच्या प्रचारासाठी आले, असं कधीही ऐकिवात आलेले नाही. त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की, त्यांच्या पक्षाचे चिन्ह सोडून दुसऱ्याच्या प्रचारासाठी जायची पहिल्यांदाच वेळ आली.

मोदींचे हाल स्थानिक भाजप नेत्यांमुळे

भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांमुळे मोदीसाहेबांवर बेतली आहे की बाहेरच्या मोठ्या राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका आहेत. पण महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागत आहे आणि या पाच टप्प्यांत त्यांना नरेंद्र मोदींनाच प्रचारासाठी आणायचे आहे. मोदींचे एवढे हाल राज्यातील भाजप नेत्यांमुळे झाले आहेत. तुम्ही मराठ्यांना खेटू नका, असं म्हटलं होतं. तीच चूक भाजपचे स्थानिक नेते करत आहेत. आरक्षण मागणाऱ्या गोरगरिब लोकांवर एमपीडीसारखे गुन्हे दाखल केले आहेत. महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे, असा दावाही जरांगे यांनी केला.

सत्काराला केला म्हणजे पाठिंबा दिला असे नव्हे

जरांगे म्हणाले, माझा सत्कार करायला कोण आलं होतं, त्यांना मी ओळखलं नाही. सत्काराला येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्या ओळखीची नसते. ते कोणत्या पक्षाचे आहेत हे मला माहिती नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. आमच्या सत्काराला आले म्हणजे आम्ही त्यांना पाठिंबा दिला असं होत नाही आणि माझ्याकडून तसं होणारही नाही.

दोघांनी आमचं वाटुळं केलंय

मराठा समाज आता आपले फायदे दुसऱ्याला घेऊ देत नाही. मीच घेऊ देत नाही, तर मराठे कधी घेऊन द्यायचे. गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसवाल्यांनीसुद्धा आम्हाला काही दिलं नाही. गेल्या १५ वर्षांत यांनीही काही दिलं नाही. भाजपवाल्यांनी आता आमचं ताजं थोबाड हाणलं आहे. त्यांनी होतं ते १६ टक्के आरक्षण घालवलं आहे. त्यामुळे दोघेही आमच्यासाठी सारखेच आहेत. दोघांनी आमचं वाटुळं केलेले आहे. आम्ही आता पर्याय दिलेला नाही, त्यामुळे समाज बरोबर ठरवेल की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं.

त्यांच्या पाच पिढ्यांना निवडणुकीची भीती वाटली पाहिजे

काँग्रेस एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण काढून अल्पसंख्याक समाजला देणार आहे, असा आरोप होते या प्रश्नावर जरांगे म्हणाले की, ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. आमच्याला मात्र काडी लावली त्यांनी. महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांमध्ये प्रचंड मराठाद्वेष भरलेला आहे. त्यामुळेच मोदींवर ही परिस्थिती आली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र सोडता येईना. इथच मराठा जिंकला आहे. कारण आता ऐकीची भिती निर्माण झाली आहे. आता मतांची भीती वाटली पाहिजे. पाडणाऱ्यांना असं पाडा की त्याच्या पाच पिढ्याला निवडणुकीला उभं राहायची भीती वाटली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT