Solapur, 18 March : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच उचलबांगडी करण्यात आलेले प्रशासक मोहन निंबाळकर यांच्याकडेच पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीचा कारभार सोपविण्यात आलेला आहे. केवळ 12 दिवसांतच निंबाळकरांची पुनर्नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्या शिफारशीवरून पणन मंत्र्यांनी मोहन निंबाळकर यांची सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे, असा आरोप मोहन निंबाळकरांच्या विरोधात तक्रार करणारे डॉ. बसवराज बगले यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार कल्याणशेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) प्रशासकपदी पणन उपसंचालक माेहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. बसवराज बगले यांनी प्रशासक निंबाळकर यांच्या कामकाजाच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीनंतर पणन उपसचिवांनी निंबाळकर यांची प्रशासकपदावरून उचलबांगडी केली होती.
निंबाळकर यांच्या जागी सोलापूर शहर उपनिबंधक प्रगती बागल यांच्याकडे ५ मार्च रोजी सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदाचा कार्यभार देण्यात आला होता. प्रगती बागल यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवातही केली होती. व्यापाऱ्यांकडून सध्या सेस भरून घेण्याचे काम सुरू आहे. बागल यांनी त्याबाबत पावले टाकून सेस वसुलीची मोहीम सुरू केली होती.
एकीकडे बागल यांनी बाजार समितीत कामाला सुरुवात केलेली असतानाच मोहन निंबाळकर यांची पुन्हा सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पणन उपसचिव संतोष देशमुख यांनी १७ मार्च रोजी त्याबाबतचा आदेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पाच मार्च रोजीचा आदेश रद्द करून निंबाळकर यांच्याकडेच पुन्हा हा कार्यभार देण्यात आलेला आहे, त्यामुळे निंबाळकरांना पुन्हा बाजार समितीत प्रशासक म्हणून आणायचे होते, तर प्रगती बागल यांची नियुक्ती का करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ. बसवराज बगले यांनी मोहन निंबाळकरांच्या कामकाजासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींचे काय झाले, त्या तक्रारींचे निवारण झाले का? निंबाळकर यांनाच पुन्हा सोलापूर बाजाार समितीत का आणण्यात आले, असे प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहेत.
‘मार्च एंडिंग’मुळे सध्या सोलापूर बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून सेस भरून घेतला जात आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या परवान्याचे नूतनीकरणही सुरू आहे. या सर्व घडामोडीत मोहन निंबाळकर यांच्याकडेच अवघ्या पंधरा दिवसांत सोलापूर बाजार समितीची धुरा सोपविण्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही प्रशासकीय सचिव म्हणून निंबाळकर यांनी सोलापूर बाजार समितीत काम पाहिले आहे, त्यावेळी त्यांच्या विरोधात तक्रारी झाल्या हेात्या.
आता लोकायुक्तांकडे तक्रार करणार : डॉ बगले
यासंदर्भात तक्रारकर्ते डॉ. बसवराज बगले म्हणाले, मोहन निंबाळकर यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची अद्याप चौकशी झालेली नाही. सोलापूर बाजार समितीच्या सेक्रेटरीच्या विरोधात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल मी आता लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे.
उपसचिवांच्या पत्रात काय म्हटले आहे?
मोहन निंबाळकर यांच्या नियुक्तीबाबत काढण्यात आलेल्या पत्रात उपसचिव संतोष देशमुख यांनी म्हटले आहे की, मोहन निंबाळकर यांच्याकडील पदभार काढून प्रगती बागल, उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर यांच्याकडे बाजार समितीच्या प्रशासकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आता मला आपणांस कळविण्याचे निर्देश आहेत की पाच मार्च रोजीचा आदेश रद्द करून मोहन निंबाळकर यांच्याकडे सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदाचा कार्यभार कायम ठेवण्यात यावा, त्यामुळे उपसचिवांना कोणाचे निर्देश आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.