prashant paricharak-vasantrao deshmukh-Shubham Agawane-Pramod Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Sabahapati : मोहिते पाटील समर्थकाच्या मदतीने पंढरपुरात भाजपचा सभापती; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची परिचारकांशी हातमिळवणी

Vasantrao Deshmukh Supports to BJP : पंढरपूर पंचायत समितीत वसंतराव देशमुख यांनी प्रशांत परिचारकांना साथ दिल्याने सत्ता समीकरण बदलले. भाजपचे शुभम आगवणे सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमोद देशमुख उपसभापती म्हणून बिनविरोध निवड होणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 March : पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या दिवशी आज (ता. १२ मार्च) पंढरपूरच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाला ८, तर विरोधातील दोन्ही राष्ट्रवादी आणि भालके गटालाही ८ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच होता. मात्र, मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी आपले जुने सहकारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे शुभम आगवणे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमोद देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.

पंढरपूर पंचायत समितीच्या (Pandharpur Panchayat Samiti) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८, तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक आणि भालके गट प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एक अशा भाजपच्या विरोधात ८ जागा निवडून आल्या होत्या, त्यामुळे पंढरपुरात सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे एकत्र येतील, अशी चर्चा रंगली होती. तसेच, भालके गटासोबत परिचारक यांची युती होईल, असे सांगितले जात होते. मात्र, निवडीच्या दिवशी या दोघांना बाजूला ठेवून परिचारकांनी आपले जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अभिजीत पाटील आणि भालके गटाचे सत्तेत येण्याच्या आकांक्षावर पाणी फिरले आहे.

वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) हे मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जातात. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या देशमुख यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्षपद सोपवले होते, त्यामुळे आता पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीतही देशमुख यांनी मोहिते पाटील यांचा सल्ला घेतला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतरच देशमुख यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असू शकतो, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माहिते पाटील समर्थकाच्या पाठिंब्यावरच भाजपचा सभापती ठरला आहे, हे निश्चित.

दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी खर्डी गणातून विजय झालेले भाजपचे शुभम आगवणे यांना सभापती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सभापतिपदासाठी अर्ज भरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कासेगाव गणातून जिंकलेले प्रमोद देशमुख यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज भरला आहे. वसंतराव देशमुख यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भालके आणि अभिजीत पाटील गटाकडून अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे आगवणे आणि देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT