

Sangola Operation Lotus News : सांगोला तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राबवलेले ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी ठरले आहे. पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या तोंडावरच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे अचानक बदलली आहेत.
या राजकीय भूकंपामुळे पंचायत समिती वरील शेकापचे वर्चस्व जाणार असल्याचे दिसून येत आहे. मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वीच झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे सांगोला तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.
सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदाची पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढील कालावधीत शिवसेनेला सभापतीपद देण्याचाही निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला.
या रणनीतीनुसार जवळा गणातील पूनम इंगवले, घेरडी गणातील अशोक चोरमुले आणि अजनाळे गणातील बापू जावीर या तीन पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे पंचायत समितीतील संख्याबळात महत्त्वाचा बदल झाला असून भाजपने सभापतीपदासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे 5 आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) चे 6 सदस्य विजयी झाले होते. मात्र या ताज्या राजकीय घडामोडींमुळे सत्तेचे समीकरण बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सांगोला पंचायत समितीवर तब्बल 55 वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. या काळात शेकापव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाचा सभापती झाला नव्हता. मात्र सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सांगोला पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा (BJP) सभापती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळा गणातील सदस्या पूनम इंगवले यांचे नाव संभाव्य सभापती म्हणून चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.