Sharad Pawar-Ramesh Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam Meet Sharad Pawar : माजी आमदाराने घेतली शरद पवारांची भेट; विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 August : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कारण, कदम हे मोहोळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याचे संकेत आहेत, त्यामुळे कदम-पवार भेटीनंतर विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोहोळमध्ये नवे समीकरण तयार होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता. रमेश कदम हे लोकसभेला सोलापूरमधून (Solapur) लोकसभेसाठी इच्छुक होते. त्या संदर्भात त्यांनी ‘एमआयएम’कडून चाचपणीही केली होती.

मात्र, ऐनवेळी ‘एमआयएम’ने त्यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने रमेश कदम यांनीही माघार घेतली होती. त्या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना पाठिंबा जाहीर केला होता, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कदम हे कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीत मोहोळ मतदारसंघ (Mohol Constituency) हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे, त्यामुळेच त्यांनी शिवस्वराज यात्राही या मतदारसंघात आणली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यात कदम यांची भर पडली आहे. त्या दृष्टीने शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही रमेश कदम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कदम यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दोन वेळा भेट घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोहोळमध्ये कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता आहे.

रमेश कदम यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवली. मोदी लाट असतानाही त्या निवडणुकीत कदम विजयी झाले होते. मात्र, अण्णाभाऊ साठे महामंडळामधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांना अटक झाली होती.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ज्येष्ट नेते शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. आता ते पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात आल्याने आगामी विधानसभेची निवडणूक पवारांच्या राष्ट्रवादीतून लढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT