मोहोळचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर हे पाच वर्षांनंतर पुन्हा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत असून, हा पक्षप्रवेश कार्यक्रम २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
क्षीरसागर कुटुंबीयांचा भाजप व शिवसेनेशी जुना संबंध आहे, त्यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या असून, नेहमीच मतदारसंघात दोन नंबरची मते मिळवली आहेत.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घरवापसीला राजकीय महत्त्व आहे, कारण क्षीरसागर कुटुंबाचे मोहोळ आणि परिसरात मजबूत मतांचे पॉकेट असल्याने भाजपला नगरपरिषद निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
Solapur, 28 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोहोळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर हे पिता पुत्र सुमारे पाच वर्षांनंतर भारतीय जनता पक्षात घरवापसी करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. २९ ऑक्टोबर) मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
मोहोळचे क्षीरसागर कुटुंबीय हे आधी जनसंघात आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून १९९९ आणि २००४ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतरची २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तमप्रकाश खंदारे यांना उमेदवारी दिल्यानंतर नागनाथ क्षीरसागर यांनी अपक्ष निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली होती.
पुढच्या २०१४ च्या निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांचे बंधू संजय क्षीरसागर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मोहोळच्या क्षीरसागर कुटुंबीयाने शिवसेनेत जाणे पसंत केले. मात्र क्षीरसागर कुटुंबीय पहिल्यापासून भाजप-शिवसेना विचारांचे कट्टर समर्थक राहिलेले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीतही सोलापूर मतदारसंघातून क्षीरसागर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांना डावलून भाजपने राम सातपुते यांना सोलापूरच्या रणांगणात उतरविले होते. आता पुन्हा पाच वर्षांनंतर नागनाथ क्षीरसागर हे उद्या पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. क्षीरसागर कुटुंबाने आतापर्यंत लढवलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कायम दोन नंबरची मते घेतली आहेत.
नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या राष्ट्रीय, प्रदेश कार्यकारिणीवर काम केले आहे. तसेच, भाजपच्या अनुसुचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर कुटुंबीयांचा भाजप प्रवेश महत्वपूर्ण मानला जातो.
तालुक्याबरोबरच, मोहोळ शहरातही क्षीरसागरांचे मतांचे पॉकेट आहे, त्यामुळे मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. मोहोळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी क्षीरसागर कुटुंबीयांतील विद्यमान नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी दावेदार मानल्या जातात.
क्षीरसागर कुटुंबीयाने आतापर्यंत कायम प्रवाहाच्या विरोधात राजकारण केले आहे. मात्र, फसव्या मित्रांपेक्षा दिलदार विरोधक बरा म्हणून आम्ही पुन्हा प्रस्थापित नेत्यांसोबत भाजपमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
1. नागनाथ क्षीरसागर पुन्हा भाजपमध्ये केव्हा प्रवेश करणार आहेत?
२९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रवेश सोहळा होणार आहे.
2. क्षीरसागर कुटुंबीय पूर्वी कोणत्या पक्षात होते?
ते जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षात होते, नंतर काही काळ शिवसेनेत गेले होते.
3. त्यांच्या पुनर्प्रवेशाचा राजकीय अर्थ काय आहे?
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल.
4. मोहोळ नगराध्यक्षपदासाठी संभाव्य दावेदार कोण आहेत?
क्षीरसागर कुटुंबीयांतील नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या पत्नींचे नाव पुढे येत आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.