Karmala Umrad Voting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Voting : धक्कादायक...करमाळ्यात 200 पेक्षा जास्त जिवंत मतदारांना दाखवले मृत; मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता

Madha Lok Sabha Election 2024 : उमरड येथे आज (ता. 07 मे) सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदानासाठी आलेल्या काही मतदारांच्या नावापुढे मयत लिहिलेले आढळले, त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असा पवित्रा मतदान अधिकाऱ्यांनी घेतला. आम्ही जिवंत असताना मतदार यादीत आम्हाला मयत कसे काय दाखवण्यात आले, असा जाब संबंधित मतदारांनी अधिकाऱ्यांना विचारला. मात्र, त्या अधिकाऱ्यांना याबाबत काही सांगता आले नाही.

अण्णा काळे

Karmala, 07 May : करमाळा तालुक्यातील उमरड येथे 200 पेक्षा जास्त मतदारांना मतदार यादीत मृत असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे जिवंत असूनही या दोनशेपेक्षा अधिक मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी मतदान केंद्रावर ठिय्या मांडला, त्यामुळे काही वेळ मतदान बंद ठेवावे लागले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख मोहिते, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, साडेपाचपर्यंत कोणताही आदेश न आल्याने ते दोनशेपेक्षा जास्त मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

उमरड येथे आज (ता. 07 मे) सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदानासाठी आलेल्या काही मतदारांच्या नावापुढे मयत लिहिलेले आढळले, त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असा पवित्रा मतदान अधिकाऱ्यांनी घेतला. आम्ही जिवंत असताना मतदार यादीत आम्हाला मयत कसे काय दाखवण्यात आले, असा जाब संबंधित मतदारांनी अधिकाऱ्यांना विचारला. मात्र, त्या अधिकाऱ्यांना याबाबत काही सांगता आले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुमच्या नावासमोर मयत लिहिलेले आहे, त्यामुळे आम्ही हे कसे घडले, याबाबत सांगू शकत नाही. आमच्या समोर जी मतदार यादी आहे, त्याप्रमाणे आम्ही मतदान करून घेत आहोत, असे त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारणी बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर साधारणपणे शंभरपेक्षा जास्त मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारांनी आक्रमक पवित्रा घेत मतदान केंद्रावरच ठिय्या मांडला, त्यानंतर जोपर्यंत आम्हाला मतदान करता येत नाही, तोपर्यंत मतदान बंद ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर काही काळ मतदान बंद ठेवण्यात आले होते.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चारुशीला देशमुख मोहिते, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मतदारांनी हा प्रकार त्यांना सांगितला. याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे मार्गदर्शन मागवले असून या मतदारांना कसे मतदान करता येईल, याबाबत विचार सुरू आहे, टोकडे यांनी सांगितले

दोनशेपेक्षा जास्त मतदारांना मयत कसे दाखवले?

मतदारांच्या नावापुढे मयत असे लिहिल्याने अनेकांना मतदान करता येत नसल्याचे समजल्यानंतर आम्ही वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी केली. त्यामुळे काही काळ मतदान बंद ठेवण्यात आले हेाते. मात्र, इतरांची गैरसोय नको म्हणून पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असताना दोनशेपेक्षा जास्त मतदारांना मयत कसे दाखविण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करमाळ्यातील बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी केली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT