Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Dcc Bank : पवारांच्या खासदाराची DCC बॅंकेच्या निवडणुकीतून माघार; 19 जागांसाठी 159 अर्ज शिल्लक, मोहिते पाटील कुटुंबातील कितीजण लढणार?

Dhairyasheel Mohite Patil withdraws : सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माघार घेतली आहे. उच्च न्यायालयाने रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याने कुटुंबाच्या सहभागाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माघार घेतली आहे. आजपर्यंत एकूण सात जणांनी आठ ठिकाणाहून माघार घेतली आहे. बॅंकेच्या १९ जागांसाठी १५९ उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. दुसरीकडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरविला आहे, त्यामुळे सोलापूर डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबातील किती जण असणार, याची उत्सुकता असणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा उद्या (मंगळवारी, ता. १७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पाच जणांनी माघार घेतली आहे. यापूर्वी दोघांनी माघार घेतली असून आजपर्यंत एकूण सात जणांनी आठ ठिकाणाहून माघार घेतली आहे. उद्या शेवटचा दिवस असून आणखी किती लोक माघार घेतात, याकडे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या बॅंकेच्या १९ जागांसाठी १५९ उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कृषी पणन प्रक्रिया आणि दुग्ध विकास संस्था या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला आहे. याशिवाय कृषी पणन प्रक्रिया मतदारसंघातून बाबूराव रामचंद्र गायकवाड, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नानासाहेब पंढरीनाथ नाईकनवरे, माळशिरस सोसायटी गटातून संग्रामसिंह जहागिरदार आणि सुभाषराव निंबाळकर यांनी माघार घेतली आहे. यापूर्वी सिद्धाराम चाकोते नागरी बँका व पतसंस्था आणि विश्वेश्वर नागूर यांनी अक्कलकोट सोसायटी मतदारसंघातून माघार घेतली आहे.

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून आतापर्यंत सात जणांनी माघार घेतली आहे. माघारीला केवळ एक दिवस शिल्लक असताना केवळ सात जणांनी माघार घेतलेले असल्याने जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध होणे कठीण दिसत आहे, त्यामुळे बॅंकेचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे आणि सुरेश हसापुरे यांच्यासह सहा माजी संचालकांचे अपिल मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळले आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. मात्र, या सहा जणांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या सोलापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT