Nitin Gadkari, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : कऱ्हाडशी जवळीक तुटू देऊ नका; उड्डाणपुलाचा प्रश्न उदयनराजेंनी मांडला गडकरींपुढे

Umesh Bambare-Patil

Karad News : कऱ्हाड शहरानजीक काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या आराखड्यात प्रसंगी बदल करावा; परंतु कऱ्हाड शहराची महामार्गाशी असलेली जवळीक तुटू देऊ नये, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत श्री. गडकरी यांनी आराखड्यात तातडीने आवश्यक बदल करण्याच्या सूचनाही महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या कामातील अपेक्षित बदलांसंदर्भात खासदार उदयनराजेंनी Udayanraje Bhosale मंत्री गडकरी Nitin Gadkari यांची बुधवारी (ता. २०) नवी दिल्ली येथे भेट घेतली. कऱ्हाडजवळ महामार्गावरील पूल सध्याच्या आराखड्याप्रमाणे जेथे संपतो तेथून शहर खूप दूर आहे. शहरातून महामार्गावर येण्यास बराच वेळ लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

माजी आमदार आनंदराव पाटील, अतुल भोसले, माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव आणि इतर लोकप्रतिनिधी, नागरिकांची यासंदर्भात खासदार उदयनराजे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत करण्यात आलेल्या मागण्यांची माहिती उदयनराजे यांनी या भेटीदरम्यान गडकरी यांना दिली.

‘कऱ्हाड हे अत्यंत महत्त्वाचे शहर असल्यामुळे महामार्गापासून ते तुटू देणार नाही,’ असे सांगून गडकरी यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आराखड्यात उचित बदल करण्याच्या सूचना दिल्या. उंब्रज हेही महामार्गावरील बाजारपेठेचे शहर असून, तेथे सध्याच्या आराखड्यानुसार भराव पद्धतीचा पूल होणार आहे. त्यासाठी अधिक जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे.

उंब्रजचे सरपंच आणि ग्रामस्थांनी त्यास हरकत घेतली असून, सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या जागी कोणतीही अतिरिक्त जमीन संपादित न करता नवीन उड्डाणपूल उभारावा, अशी मागणीही खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. केंद्रीय मार्ग निधीमधून (सीआरएफ) सातारा जिल्ह्यातील रस्तेदुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी, तसेच ब्रिटिशकालीन पुलांच्या डागडुजीसाठी २०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. गडकरी यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वन्यजीवांना अभय द्यावे

महामार्गावर खिंडवाडीजवळ गेल्या आठ वर्षांत चार वन्यप्राण्यांचा महामार्ग ओलांडताना मृत्यू झाला आहे. अजिंक्यतारा ते जनाई-मळाई डोंगर हा वन्यजीवांचा पारंपरिक स्थलांतरमार्ग असून, महामार्ग विस्तारीकरणामुळे तो विभक्त झाला आहे. वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी पुलासारखा मार्ग तयार करावा, अजिंक्यताऱ्याच्या बाजूला महामार्गालगत तार कुंपण करावे, तसेच उतारावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर स्ट्रिप आणि वन्यजीवांचा वावर दर्शविणारे फलक उभारावेत, अशा मागण्या खासदार उदयनराजे यांनी केल्या.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT