MP Vikhe inspected the flood in Shirdi Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

खासदार विखेंनी केली शिर्डीतील पूराची पाहणी : पाच दिवसांत पडणार अतिक्रमणांवर हातोडा

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी शिर्डीतील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.

सरकारनामा ब्युरो

Shirdi : शिर्डीत परवा ( मंगळवारी ) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे साईभक्त व नागरिकांचे मोठे हाल झाले. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागातील झोपडपट्टीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. ही माहिती मिळताच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी शिर्डीतील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून प्रशासनाला उपाययोजनेबाबत निर्देश दिले.

शिर्डीत ओढे व नाल्यांत अतिक्रमणे झाल्याने पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविला गेला. त्यामुळे शिर्डी शहरात जलप्रलय झाला. शिर्डीत काही ठिकाणी तीन फुटांपर्यंत पाणी होते. हे पाणी घरात गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना घर सोडून नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला आश्रय घ्यावा लागला.

शिर्डी आणि परिसरात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शहरात पाणी साठल्याने शहरातील नागरिकांना मोठा त्रास झाला. या संपूर्ण परिसराची खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दुचाकी व काही ठिकाणी चक्क रिक्षातून पाहाणी केली. तसेच नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत दिलासा दिला. त्यांनी शिर्डीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने ओढे नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शिर्डी नगर पंचायतीमध्ये अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली आणि उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपालिका मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलास कोते, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, अभय शेळके, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सुधीर शिंदे, रवींद्र कोते, मधुकर कोते, रामभाऊ कोते, दत्तू कोटे, ताराचंद कोते, सचिन कोते, भाजप ओबीसी मोर्चाचे बाळासाहेब गाडेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित पत्रकारांना खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, हे नैसर्गिक संकट आहे. शिर्डी व परिसरात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे सर्व प्रवाह शिर्डीतील विशिष्ट भागात जमा झाला. अनेकांच्या घरात पाणी गेले. अनेकांनी अतिक्रमणे करून ओढे-नाले बुजविले आहेत. या त्रुटी यापूर्वीच आमच्या समोर आल्या होत्या. याबाबत नागरिकांना आवाहन करूनही त्यांनी या बाबी गांभीर्याने घेतल्या नाही. कारण त्यात अनेकांचे प्रपंच चालत होते. आता लोकांना ओढे-नाल्यांची गरज काय याची जाणिव झाली आहे. त्यामुळे आगामी पाच दिवसांत ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ज्या कुटुंबाचे निकसान झाले आहे. त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाकडून मदत दिली जाईल. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त भागाचा जो निकष ठरवून दिला आहे. त्या निकषाच्या पलिकडे जाऊन भाजपच्या वतीने व्यक्तिगत रोख स्वरूपातील मदतीचे नियोजन करण्यात येत आहे. दोन दिवसांत धान्य व रोख मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT