Karad, 31 October : पुणे पदवीधर मतदार संघांच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजयानंतर माजी मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी येऊन दर्शन घेतले. त्यावेळी आमदार देशमुख यांचे पिताश्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आपलं मन मोकळं केलं. ‘विधानसभा निवडणुकीत मला विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र, मुलीने ते माझे स्वप्न पूर्ण केले, याचे समाधान आहे,’ अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख म्हणाले, आम्हाला (स्व.) यशवंतराव चव्हाण यांचे पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचे आहे. मी एकदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र, मुलीने ते माझे स्वप्न पूर्ण केले, याचे समाधान आहे.
समाजासाठी मी काम करत आहे. लोकांशी माझा जो संपर्क आहे, तो मतरुपाने लोकांनी दाखवून दिला आहे. ही निवडणूक जनतेने विशेषतः तरुणांनी हातात घेतली होती, त्यामुळे हा विजय जनतेला-तरुणाला समर्पीत करत आहे, असेही देशमुख यांनी नम्रपणे नमूद केले.
दरम्यान, प्रभाकर देशमुख यांनी २०१९ मध्ये माण मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देशमुख त्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या वेळी जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख आणि शेखर गोरे यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीत जयकुमार गोरे यांनी काठावरचा विजय मिळविला होता. त्यांना देशमुख यांनी जोरदार लढत दिली होती, त्या निवडणुकीत देशमुख यांना अवघ्या ३०४३ मतांनी विजयाने हुलकावणी दिली होती.
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत थोडक्यात झालेल्या पराभवाची सल अजूनही देशमुख यांच्या मनात सलत असल्याचे दिसून आले. ती सल त्यांनी मुलगी हर्षदा देशमुख जाधव यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात मिळविलेल्या विजयानंतर बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.