

Solapur, 30 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. संचालकांच्या १९ जागांसाठी तब्बल २३८ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, १९९३ पासून २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २५ वर्षे संचालक राहिलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल प्रथमच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून दूर राहिले आहेत. विशेष म्हणजे आमदार सोपल आणि त्यांचे बंधू सुधीर सोपल यांचा नागरी बॅंका आणि पतसंस्था मतदारसंघातून ठराव झाला होता. त्यानंतरही सोपल कुटुंबीयांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात १९९५ ते १९९९ दरम्यान शिवसेना-भाजप युती सरकार होते. त्यावेळी बार्शीतून दिलीप सोपल अपक्ष आमदार होते. युती सरकारला त्यांनी पाठिंबा दिल्याने सरकारचा माणूस म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. बँकेच्या इतिहासात त्यांनी १९९७ मध्ये तब्बल ९१७ जागांची रेकॉर्डब्रेक नोकरभरती केली होती. तत्कालीन सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या परवानगीने व रोष्टरचे पालन करून ही भरती झाली. त्या काळात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना आजही डीसीसीच्या वर्तुळात ‘सोपलांची बॅच’ म्हणून ओळखले जाते.
सोलापूर डीसीसी बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघात बार्शीत १३७ सोसायट्या मतदानाला पात्र ठरल्या आहेत. यातील बहुतांश सोसायट्या ह्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या विचारांच्या आहेत. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे कुठून बॅंकेत येणार, याची उत्सुकता होती.
आमदार दिलीप सोपल हे १९९३ मध्ये पहिल्यांदा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून विजयी झाले होते. त्यांनी २०१८ पर्यंत म्हणजे तब्बल २५ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले होते. मात्र, सहकारातील बदलत्या राजकारणामुळे सोपल हे जिल्हा बॅंकेची निवडणूक लढविणार का आणि ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता हेाती.
सोसायटी मतदारसंघातून बार्शीने माजी आमदार किसनराव (कृष्णराव) देशमुख यांना १९७० ते १९८६ या काळात संधी दिली. त्यानंतर कौरव माने १९८६ ते १९९३ या कालावधीत संचालक बनले. आमदार दिलीप सोपल हे १९९३ मध्ये पहिल्यांदा बँकेचे संचालक म्हणून विजयी झाले. त्यांनी २०१८ पर्यंत म्हणजे तब्बल २५ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. आता आमदार राऊत यांच्या रूपाने तब्बल ३३ वर्षांनी नवा चेहरा बार्शीतून डीसीसीच्या राजकारणात येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.