Bhausaheb Wakchoure News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhausaheb Wakchoure News : संदीप घनदाट यांच्या ठाकरे भेटीनंतर भाऊसाहेब वाकचौरेंचे सूचक विधान; म्हणाले...

Uddhav Thackeray Shivsena : उमेदवारीसाठी घनदाट यांचे नाव समाेर आल्याने ठाकरे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, याबाबत नगरमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political news: लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा उमेदवारीसाठी इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. या दृष्टीने इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी अपेक्षित पक्षाच्या पक्ष नेतृत्वाला भेटत असून, उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावत आहेत. अशात शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून अंतिम मानले जात असताना माजी आ. सीताराम घनदाट यांनी आपले पुत्र आणि अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिर्डीच्या ठाकरे गटाच्या उमेदवारीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

काही माध्यमातून घनदाट परिवाराची उद्धव ठाकरें सोबत झालेल्या भेटीबाबत वृत्त प्रसिद्ध झाले असून, त्यात ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेसाठी अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली असून घनदाट परिवाराला कामाला लागण्याचे सांगितले असल्याचा दावा केला गेला आहे. संजय घनदाट हे माजी आमदार सीताराम घनदाट यांचे चिरंजीव आहेत. या वृत्तामुळे शिर्डी लोकसभेसाठी भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या दाव्यानंतर आता या स्पर्धेत तिसरे नाव घनदाट यांचे आल्याने ठाकरे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला यावर नगर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारीची मला शंका नाही

या पार्श्वभूमीवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी, उद्धव साहेबांनी मला स्वतः बोलावून घेऊन पक्ष प्रवेश दिला असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने योग्य ते आदेश आणि सूचना केल्या असल्याचा दावा 'सरकारनामा'शी बोलताना केला आहे. उद्धव साहेबांच्या आदेशानंतर आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला असून, आपल्याला उमेदवारीबाबत कसलीही शंका नसल्याचे स्पष्ट केले.

मी नगर जिल्ह्यातील आणि शिर्डी मतदारसंघातील भूमिपुत्र आहे. जिल्ह्यात अनेक वर्षे जिल्हा परिषदेत गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी तसेच शिर्डी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून पाच वर्षे शिर्डीचे खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या काळात काही चुका झाल्या. मात्र खुद्द उद्धव साहेबांनी मला मुंबईत बोलावून पुन्हा पक्ष प्रवेश दिलेला असल्याने शिर्डी लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबाबत आपल्याला कसलीही शंका नसल्याचे वाकचौरे यांनी "सरकारनामा"शी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

राज्यात महाविकास आघाडी असून, आघाडीचा धर्म म्हणून योग्य वेळी आपल्याबाबत पक्षाकडून (उमेदवारीचा) निर्णय घोषित होईल. त्या दृष्टीने आपण कामाला लागलो आहोत. रोज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले आहे. तसेच मविआतील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही भेटी झाल्या असून, माझ्याबाबत ही नेते मंडळी अगदी सकारात्म असल्याचा दावाही वाकचौरे यांनी केला आहे. येत्या सोमवारी आपण मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती वाकचौरे यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT