Solapur, 15 March (विठ्ठल सुतार) : गेल्या महिनाभरापासून उत्सुकता शिगेला पोचलेल्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले आहे. आतापर्यंत संधी न मिळालेल्या आणि बाजार समिती, नगरपालिकेनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून देणारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शीकडे अध्यक्षपद जाणार, हे निश्चित आहे. जिल्ह्यातील आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दीपक वैद्य यांच्या नावावर एकमत करून ते मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) ६८ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ३८ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा भाजपचा पहिला अध्यक्ष कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच भाजपच्या गटातून प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे.
सुरुवातीच्या काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, विमल खरात, दीपक वैद्य, रामप्पा चिवडशेट्टी, वंदना कांबळे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, भाजपच्या गोटातून एक नाव निश्चित झाले असून आतापर्यंत एकदा संधी न मिळालेल्या बार्शीला (Barshi) अध्यक्षपदाची जाणार असल्याची माहिती आहे. दीपक वैद्य यांचे नाव निश्चित असून त्यांच्याकडून भाषणाची तयारीही करून घेतली जात आहे.
नव्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले असून त्याची घोषणा ही येत्या १७ मार्च जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे झेडपी अध्यक्षपद हे धनगर समाजाकडे जाणार असल्याचेही निश्चित करण्यात आलेले आहे. माढा, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील सदस्यांची नावे चर्चेत होत. पण, अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश पाहता अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ही १८ मार्च रोजी होणार आहे. अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव असून, अध्यक्षपदी महिला की पुरुष असणार याबाबत मात्र गोपनीयता ठेवण्यात आली आहे. भाजपकडून जातीय समीकरणे जुळवण्यासाठी धनगर समाजाला संधी देण्यात येणार आहे. सर्व आमदारांनी नावावर एकमत करून मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवले आहे. अध्यक्षपदाचे नाव खुद्द मुख्यमंत्री फडणवीस स्वत: १७ मार्च रोजी जाहीर करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. सर्वाधिक ३८ सदस्य निवडून आले आहेत, त्यामुळे अध्यक्षाबरोबरच इतर सर्व पदाधिकारीही भाजपचे असणार आहेत. ज्या तालुक्यास अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही, त्या तालुक्यास संधी देण्याची शक्यता आहे. भाजपकडून विजयी झालेल्या सदस्यांमध्ये सर्वच सदस्य पहिल्यांदाच विजयी झाले असल्याने अध्यक्षपदाची जबाबदारी पेलणारा सक्षम चेहरा कोण, यावर तर्क-वितर्क सुरू आहेत.
ही नावेही चर्चेत...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गटातून विजयी झालेले रामप्पा चिवडशेट्टी, माढा तालुक्यातील मोडनिंब गटातून विजयी झालेल्या वंदना कांबळे यांचीही नावे चर्चेत आहेत. पण जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्याठिकाणी महिलेला संधी देणार की पुरुषाला, अशी चर्चा होती. पण, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव आहे, त्याच प्रवर्गाला संधी देण्यात येणार आहे. त्यातूनच अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.