Solapur, 07 June : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पक्षाचे तीन आमदार त्यांच्यासोबत नाहीत. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनीही भाजपच्या बाजूने जाण्याचे संकेत दिले आहेत. मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मात्र देशमुख यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत व इतर नेतेमंडळींनी शनिवारी रात्री करमाळ्यात जाऊन आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली. त्या बैठकीत आमदार पाटील यांनी भाजपचे उमेदवार राऊत यांना पाठिंबा देण्याचा जाहीर केला.
राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरतानाही आमदार नारायण पाटील आणि शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. त्यामुळे हे दोघे भाजपसोबत जाण्याचे संकेत अर्ज भरण्याच्या दिवशीच मिळाले होते. पण पाटील यांनी करमाळ्यात समर्थकांशी चर्चा करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री गोरे यांनी आमदार पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.
दरम्यान, पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी भाजपसोबत जाऊन आमदार अभिजीत पाटील यांच्या गटाचा सत्तेचा डाव वसंतराव देशमुख यांनी उधळला होता. तसेच, देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना मोहिते पाटलांनी विश्वासात घेतले नाही, असे सांगून आपण देशमुखांसोबत नसल्याचे स्पष्ट केले होते.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला, असा आरोप करत देशमुख यांच्या उमेदवारीसोबत आपण नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे उत्तम जानकर यांच्या भूमिकडे लक्ष असणार आहे. मोहाेळच्या आमदारांनीही सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी आज देशमुखांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
जानकरांची भेट
पाठिंब्याबाबत आमदार राजू खरे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा जोरात प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. तुम्हाला या निवडणुकीत चमत्कार पाहायला मिळेल. आमदार उत्तम जानकरांची मी आजच भेट घेतली आहे. पक्षातील अंतर्गत वाद माध्यमांसमोर आणायला नको होता, असेही मी त्यांना सांगितले आहे.
शरद पवारांनी आम्हाला ताकद दिलीय
आमदार अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांनी वेगळी भूमिका का घेतली आहे, हे मात्र समजले नाही. जिल्ह्यातील चारही आमदार व दोन खासदार निवडून यावेत, यासाठी शरद पवारांनी आमच्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली होती. त्यामुळे आम्ही निवडून आलो, याची जाणीव मला आहे. त्यामुळेच मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहणार आहे, असेही राजू खरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.