

Solapur, 07 June : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर आणि सांगली सातारा या दोन मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बिनविरोधच्या मार्गावर असलेली सोलापूरची निवडणूक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी चर्चेत आणली आहे. महायुतीचे पारडे जड असले तरी मोहिते पाटलांनी पालकमंत्री गोरेंना मैदानात उतरून पळायला लावले आहे.
दुसरीकडे, सांगली-सातारा (Sangli-Satara) निवडणुकीत माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप यांना उतरवून पवारांच्या राष्ट्रवादीने ‘पॉवरगेम’ खेळला आहे. महायुतीमधील नाराज दोन पक्षांनी छुप्या मतदानात वेगळी भूमिका घेतली तर सांगली साताऱ्याच्या निवडणुकीला कलाटणी मिळू शकते.
सोलापूरमध्ये पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे विधान परिषद निवडणुकीत कॅप्टन आहेत, तर सांगली-सातारा मतदारसंघात गोरे यांच्या पसंतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आलेला आहे. दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे संख्याबळ पाहता मोठ्या विजयाची अपेक्षा भाजपला आहे. मात्र, दोन्हीकडेही मोठं अंडरकरंट आहेत.
सांगली-सातारा मतदारसंघात भाजपकडे ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मित्रपक्षातील नाराजांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमालीचे दुखावले आहे. सध्या पालकमंत्री शंभूराज देसाई हे भाजपसोबत दिसत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील नेते अजूनही भाजपसोबत प्रचारात दिसून येत नाहीत, त्यामुळे साताऱ्यात मित्रपक्षातील नाराज नेते माणमधील सर्वार्थाने दमदार असणाऱ्या नेत्याच्या गळाला लागणार नाहीत, याची दक्षता भाजपला घ्यावी लागणार आहे.
दुसरीकडे, सांगली जिल्हा परिषदेत तर महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिलेला आहे. तसेच, महापालिका आणि नगरपालिकांमध्येही महाविकास आघाडीतील पक्षांची मोठी ताकद आहे. याशिवाय जयंत पाटील यांच्यासारखा कसलेला कॅप्टन त्यांच्याकडे आहे. काँग्रेसही सोबतीला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी झेडपीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिलेली आहे, त्यामुळे अभय जगताप यांनी हात सैल सोडल्यास आणि सातारमधील नाराजांनी इंगा दाखवल्यास या मतदारसंघात तुल्यबळ लढाई होऊ शकते.
विधान परिषदेच्या तिकिटात डावलल्यामुळे शेखर गोरे यांच्यासारखे बाहुबली नेतेही सध्या भाजपवर नाराज असल्याचे दिसून येते. ते कोणती भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. सांगली जिल्ह्यातून अभय जगताप यांना किती कुमक मिळते, यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकतर्फी वाटणारी विधान परिषदेची निवडणूक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे रंगतदार झाली आहे. या ठिकाणी ३१३ मते एकट्या भाजपची आहेत, तर शिवसेना (६६) आणि राष्ट्रवादी काँग्रेससह (२७) महायुतीचे संख्याबळ ४०६ वर जाते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदारांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप-महायुतीचे संख्याबळ पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा पालकमंत्री गोरे यांची होती. मात्र, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद होताच मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना सोपल आणि इतर नेत्यांचा उघड पाठिंबा आहे. पण छुपा पाठिंबा मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सुरू आहेत. त्यामुळे सांगली सातारा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान जयकुमार गोरेंपुढे असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.