Narayan Patil-Tanaji Swanat-Rashmi Bagal
Narayan Patil-Tanaji Swanat-Rashmi Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कट्टर विरोधक नारायण पाटील-रश्मी बागल येणार एकत्र; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा पुढाकार

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळ्याचे (Karmala) माजी आमदार नारायण पाटील (Narayan Aba Patil-) आणि बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उपस्थितीत पुण्यातील सावंत यांच्या कार्यालयात रविवारी (ता. ४ सप्टेंबर)  बैठक झाली आहे.  ही बैठक आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सुरू करण्याविषयी झाली आहे, असे आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ यांनी सांगितले. (Narayan Patil-Rashmi Bagal will come together; Initiative of Tanaji Sawant)

पाटील व बागल यांची एकत्र बैठक झाल्याने मात्र  करमाळा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात  मात्र एकच चर्चा सुरू झाली आहे. आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम करावे, अशी सूचना मंत्री सावंत यांनी केल्याचे सांगण्यात येते. त्यासंदर्भातच या दोन्ही नेत्यांची सावंतांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच माजी आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवलेल्या रश्मी बागल यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून बागल आणि पाटील एकत्र येणार, अशा चर्चा कधी सोशल मीडियातून, तर कधी जनतेमधून ऐकायला मिळत होती . आज मात्र तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हे दोन्ही गट एकत्र येत असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी पुढाकार घेतला होता, त्यात त्यांना यश आले. बागल यांनी देखील कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.  हा कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांना मोलाची मदत केली . आदिनाथ कारखाना ओटीएस प्रक्रियेत बसवल्यानंतर नऊ कोटी रुपये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भरले आहेत.

माजी आमदार नारायण पाटील यांनी संचालक मंडळासह कारखाना स्थळावर जाऊन  शनिवारी (ता. ३ सप्टेंबर)  कारखान्याची पाहणी करून कामकाज सुरू केले आहे . याच पार्श्वभूमीवर पुणे येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल यांच्यात  समन्वय घडवून आणण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे . या वेळी आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल उपस्थित होते. याबाबत माजी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नाही.

माजी आमदार नारायण पाटील गटाचे देवानंद बागल म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता.  मात्र, तीन वर्षे बारामती ॲग्रोने हा कारखाना सुरू केला नाही. हा करार चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे लक्षात आल्याने बागल यांनी देखील बारामती ॲग्रोच्या विरोधात न्यायालयात  जाण्याचा निर्णय घेतला. हा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा; म्हणून आपण पाठपुरावा केला  यात आम्हाला यश आले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यात मोठी मदत केली.

सध्या कारखाना बागल गटाच्या ताब्यात आहे, त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बागल आणि आम्हाला बैठकीसाठी बोलावली होते. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखान्याचे गाळप झाले पाहिजे, यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आमची बैठक झाली. आरोग्य मंत्री सावंत यांच्या  मार्गदर्शनाखाली  आम्ही आदिनाथ कारखान्याचे कामकाज सुरू होणार आहे, असे देवानंद बागल यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT