Solapur, 19 April : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मतमोजणीच्या पहिल्यात टप्प्यातच सुमारे दीड ते दोन हजार मतांची आघाडी घेतली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या जोमाने कामाला लागलेले माजी आमदार संजय शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Adinath Sugar Factory Election) गुरुवारी ६०.७९ टक्के मतदान झाले होते. आदिनाथ कारखान्याची सत्ता मिळविण्यासाठी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनेल असले तरी खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्येच होती.
संजय शिंदे (Sanjay Shinde) हे मागील टर्ममध्ये करमाळ्याचे आमदार होते. मात्र, आमदारीकच्या काळात त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या राजकारणात लक्ष घातले नव्हते. मात्र, विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार शिंदे यांनी कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे विधानसभेनंतर शिंदे गटाला राजकीय टॉनिक मिळणार का?, याची उत्सुकता होती.
आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेला माजी आमदार जयवंतराव जगताप, मोहिते पाटील समर्थकांची साथ होती. याशिवाय गेली वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ काखान्यावर सत्ता असणाऱ्या बागल गटानेही शेवटपर्यंत आपले पत्ते खुले केले नव्हते. मात्र, त्यांनीही नारायण पाटील गटाला पाठिंबा दिल्याचे मतदानादिवशी दिसून आले, त्यामुळे नारायण पाटील यांच्या पॅनेलचे पारडे निवडणुकीत जड होते, हे मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच दिसून आले. मात्र बागलांच्या काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार शिंदेंनाही मदत केल्याचे दिसून आले.
माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्राचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा पाठिंबा होता. गुळवे यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्यासोबत होते. मात्र, आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीत त्यांनी संजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, आज सकाळी आठपासून आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात दुपारी दीडपर्यंत आमदार नारायण पाटील यांचे पॅनेल दीड ते दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत. उर्वरीत मतमोजणीत काय चमत्कार घडणार की मतमोजणीचा हाच ट्रेंड कायम राहणार, याची उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.